लक्ष्य सेनविरुद्ध फायनलमध्ये मलेशियाच्या लोह किन येव्हचे आव्हान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या योनेक्स-सनराईज पुरस्कृत इंडिया खुल्या आंतरराट्रीय पुरूष आणि महिलांच्या सुपर 500 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पुरूष एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. आता जेतेपदासाठी लक्ष्य सेन आणि मलेशियाचा विश्वविजेता लोह किन येव्ह यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. महिला एकेरीत पीव्ही सिंधूचे आव्हान संपुष्टात आले.
भारताचा तृतीय मानांकित बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने उपांत्य फेरीच्या सामन्यात शनिवारी मलेशियाच्या निगे टेझी यंगचा 19-21, 21-16, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. विश्व बॅडमिंटन टूरवरील 500 सुपर दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनने पहिल्यांदाच एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. 20 वर्षीय लक्ष्य सेनने विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यापूर्वी कास्यपदक मिळविले आहे.
विश्व बॅडमिंटन स्पर्धेत गेल्या महिन्यात भारताच्या बी साई प्रणित आणि किदांबी श्रीकांत यांनी यापूर्वी पदके मिळविली आहेत. लक्ष्य सेनचा मेंटर व माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोनने अशी कामगिरी केली होती. पुरूष दुहेरीच्या दुसऱया सामन्यात कॅनडाचा ब्रायन यंग याने डोकेदुखी समस्येमुळे स्पर्धातून माघार घेतल्याने विश्वविजेत्या लोह किन येव्ह याला अंतिम फेरीसाठी पुढे चाल मिळाली. लक्ष्य सेनने यापूर्वी दोनवेळा सुपर 100 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत हॉलंड खुल्या व सेरलोरलक्स बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपदे मिळविली होती.









