वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारी संकटामुळे भारतीय क्रिकेट संघाचा येत्या जुलै महिन्यातील लंकेचा क्रिकेट दौरा सध्याच्या स्थितीचा विचार करता अशक्य असल्याचे दिसून येते, असे मत बीसीसीआयच्या प्रवक्त्याने व्यक्त केले.
विविध देशांच्या क्रिकेट संघांनी आपले नियोजित क्रिकेट दौरे लांबणीवर किंवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारी नियंत्रणासाठी आरोग्य खात्याच्या संबंधीत देशांच्या शासकीय आदेशानुसारच क्रिकेट मंडळाना हे निर्णय घ्यावे लागत आहेत. दरम्यान लंकन क्रिकेट मंडळाने भारतीय क्रिकेट मंडळाला हा दौरा करण्याची विनंती केली आहे. या दौऱयामध्ये उभय संघात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने आयोजित केले आहेत. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात द्विपक्षीय क्रिकेटला पुन्हा प्रारंभ करण्याची विनंती लंकन क्रिकेट मंडळाने बीसीसीआयला केली आहे पण भारतातील सध्या कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यास हा दौरा सध्याच्या परिस्थितीनुसार अशक्य असल्याचे भारतीय क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.









