सडोलकरवाडीच्या सौरभची दुर्दैवी एक्झीट
सांगरूळ / वार्ताहर
पावर टेलरला जोडलेल्या फॅनच्या साहयाने भात वारे देत असताना फॅनचे पाते तुटून डोक्यात मार लागल्याने करवीर तालुक्यातील खाटांगळे पैकी सडोलकरवाडी येथिल युवक सौरभ सर्जेराव खाडे (वय २५ ) याचा दुर्दैवी मृत्यू झाला .
सध्या सर्वत्र भात कापणी ची सुगी जोरात सुरू आहे . भात वारे देण्यासाठी वाऱ्याचा नैसर्गिक स्त्रोत कमी पडत असल्याने बहुतांश ठिकाणी विजेची सोय असणाऱ्या ठिकाणी विद्युत मोटारीवर चालणारे फॅन वापरले जातात तर शिवारामध्ये विजेची सोय नसलेल्या ठिकाणी हाताने फिरवण्याचे फॅन व पावर टेलर ला जोडलेली फॅन चा वापर केला जातो .सौरभ पाटील शेतातील मळणी केलेल्या भाताला दुपारच्यावेळी पावर टेलरला जोडलेल्या फॅनच्या सहायाने वारे देत होते .याच दरम्यान फॅनचे पाते तुटून सौरभच्या डोक्यात कानाजवळ मार लागला . जोराचा मार बसल्याने त्याला तात्काळ कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले . पण खोलवर जखम झाल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले . शवविच्छेदन करून सोमवारी सायंकाळी त्याचेवर सडोलकर वाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .
सौरभचे वडील सर्जेराव दिनकर खाडे हे प्राथमिक शिक्षक असून सांगरुळ हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांनी अँथलेटीक्समध्ये राष्ट्रीयस्तरावर अनेक वेळा अजिंक्यपद पटकावत नावलौकिक मिळवला होता .सौरभनेही वडिलांच्या कडूनच प्रेरणा घेत शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी केली होती .क्रीडा क्षेत्राची आवड व भरती साठी सराव करून चांगली शरीर संपदा कमावली होती .गेली पाच वर्षे तो गृहरक्षक दलात कार्यरत आहे . सध्या त्याची करवीर पोलिस ठाण्यात नेमणूक आहे . त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक वर्षाचा लहान मुलगा असा परिवार आहे .त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .