प्रतिनिधी /बेळगाव
भाज्यांच्या वाढत्या दरामुळे गृहिणींचा जीव मेटाकुटीला आला आहे. गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱया बेळगावच्या भाजीपाल्याची लोकप्रियता गोवा आणि महाराष्ट्रातही पसरली आहे. परंतु आज घडीला भाजीपाल्यांच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. बेळगावमध्ये कधीकाळी वांग्यांचे दर दीड शतक पार करेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. परंतु गेल्या आठवडय़ात वाग्यांचा दर 35 ते 40 रुपये पाव किलो असा होता. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे स्वयंपाकांचे अंदाज पत्रकही कोलमडले आहे. आजही भाज्यांच्या दरात घसरण झालेली नाही.
वाग्यांचा दर 100 ते 120 रुपये प्रतिकिलो असून मिरची, दोडके, गवारी, काकडी, ढबू मिरची, भेंडी, कारली यांचा दर तर 100 रुपये किलो आहे. मेथी, शेपू 20 रुपये जोडी, पालक 10 रुपये जोडी तर कांदा पात 20 रुपये तीन जोडय़ा अशा भावाने मिळत आहेत. सध्या बाजारपेठेत मटार मात्र प्रचंड प्रमाणात आला असून 15 दिवसांपूर्वी 60 ते 80 रुपये अशा भावाने तो विकला गेला. आज मात्र त्याचा दर 50 रुपये किलो झाला आहे. टोमॅटो 50 रुपये, गाजर 60, कोबी 50 रुपये किलो असे दर आहे. वाटाण्याची आवक मात्र वाढली असून तो 100 रुपये किलो दराने मिळत आहे.
तेलाचे दर दिलासादायक
त्यातल्यात्यात सध्या निंबाचा दर मात्र उतरला आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाद्य तेलाचे दर काही प्रमाणात उतरले असून ती एक दिलासादायक बाब ठरली आहे. सूर्यफुल 160 रुपये, सोयाबिन तेल 145 रुपये, पाम तेल 120 रुपये लीटर, शेंगा तेल 160 रुपये लीटर असे दर आहेत.
सध्या तरी घरोघरी पर्याय म्हणून कडधान्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र त्याबद्दल तरुणाई नाखुश आहे. हॉटेलमध्ये सुध्दा पदार्थांचे दर काही अंशी वाढले आहेत. अजून किती दिवस हीच परिस्थिती राहील, असे प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनात आहे.









