प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सध्या जेथे पहावे तेथे भाजी विक्री केली जात आहे. हळुहळू तेथे एक मिनी भाजी मार्केटच सुरू होत आहे. असे भाजी मार्केट सुरू करता येते का, त्यासाठी परवानगी आवश्यक असते की नाही, त्यासाठी काही नियमावली आहे का, याचा विचार ना विपेते करत आहेत, ना महानगरपालिका. मात्र अशा भाजी विपेत्यांमुळे परिसरात कमालीची अस्वच्छता माजली आहे. त्याकडेसुद्धा महानगरपालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेटजवळील भाजी मार्केट हटविल्याने या विपेत्यांनी आता मंडोळी रोडवरील दत्त मंदिरासमोर भाजी विकण्यास सुरुवात केली आहे. प्रारंभी अत्यंत मर्यादित संख्या असणाऱया भाजी विपेत्यांची आता तेथे प्रचंड गर्दी झाली आहे. वास्तविक या ठिकाणी तीन-चार मंदिरे, नागरी वसाहत आणि आर्ष विद्या केंद्रासारखा आश्रम आहे. आश्रमात लहान मुली आहेत. भाजी विक्री करणारे कोणत्याही नियमाचे पालन करीत नसल्याने नागरिकांना विनाकारण त्याचा त्रास होतो आहे.
कोरोना आता दाराशी येऊन थांबल्याने प्रत्येकजण घाबरला आहे. लोकांना आपल्या आरोग्याची चिंता आहे. विपेत्यांना उत्पादित माल विकण्याची घाई आहे. मात्र समन्वयाअभावी नागरिकांना त्याचा त्रास होतो आहे. दत्त मंदिरासमोर बसणारे भाजी विपेते नियमाचे पालन करत नाहीत. लॉकडाऊनचेही त्यांना गांभीर्य नाही. रविवारी लॉकडाऊन असला तरीही येथे भाजी विक्री सुरूच असते.
सर्वात गंभीर बाब म्हणजे विपेते आणि ग्राहकसुद्धा अनावश्यक पाला, भाजी, कणसाची साले, फ्लॉवरचे देठ, अननसाची पाने यासह सर्व कचरा तेथेच कोपऱयावर टाकून निघून जातात. सध्या या परिसरात स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. एकीकडे रस्ते बांधणी सुरू आहे आणि दुसरीकडे त्याच परिसरात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. या कचऱयामुळे येथे मोकाट जनावरे, कुत्री यांचा वावर वाढला आहेच, परंतु डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सध्या कोरोनाबरोबरच डेंग्युचे संकटही भेडसावत आहे. विपेत्यांनी निर्माण केलेल्या या कचऱयामुळे आरोग्य समस्या उद्भवत असून, परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून हे मिनी भाजी मार्केट सुरूच आहे. विपेत्यांनी शिस्त आणि नियम पाळल्यास नागरिक सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे. परंतु एकूणच याच परिसरात हे विपेते कायमचे ठाण मांडून बसले तर नागरिकांना मात्र त्याचा त्रास होणार आहे. हे विपेते नियम पाळत नाहीत, मास्क वापरत नाहीत, सॅनिटायझरचा विचार तर दूरच, सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा अशा सर्व समस्या या विपेत्यांमुळे निर्माण झाल्या आहेत. या विपेत्यांना महानगरपालिकेने अधिकृत परवानगी दिली आहे का, त्यांनी निर्माण केलेल्या कचऱयाची विल्हेवाट कोण लावणार, येथील सामान्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, या प्रश्नांची उत्तरे महानगरपालिकेने द्यावीत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.









