प्रतिनिधी/ बेळगाव :
गोव्याला भाजी वाहतूक करणाऱया टेम्पोतून बेकायदा दारू वाहतूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी सकाळी उद्यमबाग पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून त्यांच्याजवळून 3 लाख 70 हजार रुपये किमतीचा बेकायदा दारुसाठा जप्त केला आहे.
मंजुनाथ सुरेश पाटील (वय 22) रा. फोर्ट रोड, सुभाष सुधीर डे (वय 39) रा. महाद्वार रोड अशी अटक करण्यात आलेल्या जोडगोळीची नावे आहेत. खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यमबागचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. के. मुल्ला, एस. आर. मेत्री, के. के. सवदत्ती, शशीकुमार गौड्र, अजित शिप्पुरे आदींनी ही कारवाई केली आहे.
गोव्याला भाजीपुरवठा करून बेळगावकडे येणारी केए 22 जी 3385 क्रमांकाची टेम्पो पोलिसांनी तिसऱया रेल्वेगेटजवळ अडविली. रिकाम्या भाजीच्या ट्रेच्या पाठीमागे दारुचे बॉक्स ठेवण्यात आले होते. त्यामुळे टेम्पोसह त्यांना उद्यमबाग पोलीस स्थानकात नेण्यात आले. पोलिसांनी भाजीचे ट्रे उतरवून टेम्पोत डोकावले असता त्यांना धक्का बसला.
अत्यावश्यक सेवेचा गैरफायदा
बेळगावहून नेलेली भाजी साखळीत उतरविण्यात आली. त्यानंतर टेम्पोत गोवा बनावटीची दारू भरून ती बेळगावकडे आणण्यात येत होती. सध्या अत्यावश्यक सेवा पुरविणाऱया वाहनांना प्रशासनाने सवलत दिली आहे. अनेकांना पासचे वितरणही करण्यात आले आहे. त्याचा गैरफायदा घेत काहीजण थेट गैरधंद्यात उतरले आहेत.
उद्यमबाग पोलिसांनी टेम्पो अडविला त्यावेळी भाजीपुरवठा करणारे वाहने असे स्टीकर त्यावर चिकटविण्यात आल्याचे आढळून आले. लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गावठी दारुचा वापर वाढला आहे. दारुच्या बाटल्यांना मोठी मागणी होऊ लागली आहे. पाच ते सहापट वाढीव दराने दारुविक्री केली जात आहे. त्यामुळेच पोलिसांनी शहराच्या प्रवेशद्वारावर तपासणी वाढविली आहे. सोमवारी अटक करण्यात आलेला सुभाष हा मिठाईचा व्यापारी असल्याचे समजते.









