प्रतिनिधी / कुंकळ्ळी
भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आज 6 रोजी साजरा केला जाणार असून यानिमित्त प्रत्येक मतदारसंघात खास कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 6 पासून सुरू होऊन 14 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी कार्यक्रमांची समाप्ती होणार आहे. केपे भाजप मंडळांतर्फे होणाऱया कार्यक्रमांसाठी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या बेतूल येथील निवासस्थानी केपे भाजप मंडळ व प्रमुख कार्यकर्ते यांच्या सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीत कार्यक्रमासंबंधी आढावा घेण्यात आला.
केपे मतदारसंघातील प्रत्येक बूथवर कार्यक्रम होणार असून यादरम्यान घरोघरी ध्वज लावण्यात येणार आहेत. याची जबाबदारी बूथ प्रमुख व इतर कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली आहे. सर्वप्रथम उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्या निवासस्थानी मंगळवारी सकाळी 10 वा. ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. दक्षिण गोवा भाजपचे अध्यक्ष तुळशीदास नाईक यांच्यावर केपे मतदारसंघ प्रभारी म्हणून पक्षाने जबाबदारी सोपविली आहे. ते पुढील निवडणुकीपर्यंत केपे मतदारसंघात सक्रिय राहणार असून नाईक यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सुरुवातीला हे स्पष्ट केले.
त्यांचे यावेळी उपमुख्यमंत्री कवळेकर व उपस्थित कार्यकर्त्यांनी स्वागत केले. बैठकीत मार्गदर्शन करताना नाईक यांनी भाजपच्या इतिहासावर नजर टाकली. पक्ष स्थापनेमागील थोडक्मयात माहिती त्यांनी दिली. भारतीय जनता पक्ष हा देशहित जपणारा पक्ष आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा होत आहे. 303 खासदार व सहकारी पक्षांचे पाठबळ लाभले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. गोव्यातील जनताही पक्षामागे असून पुढील सरकार भाजपचेच राहील. उपमुख्यमंत्री कवळेकर हे निवडून तर येतीलच, पण त्यांना सर्वाधिक मताधिक्मयाने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. त्याकरिता आपल्याला दिलेली जबाबदारी सांभाळताना सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री कवळेकर यांनीही मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष यातील फरक याकडे त्यांनी कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कार्यपद्धतीचा त्यांनी थोडक्मयात आढावा घेतला. एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. सुरुवातीला केपे भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय वेळीप यांनी आढावा घेतला. तसेच नुकताच राज्य सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला तो जनताभिमुख असल्याचे मत व्यक्त करून यावेळी सरकारच्या निर्णयांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी वरील मान्यवरांसह व्यासपीठावर गिरदोली जिल्हा पंचायत सदस्या संजना वेळीप, बाळ्ळी सरपंच दिपाली फळदेसाई, मोरपिर्ला सरपंच प्रकाश वेळीप व आंबावली सरपंच जासिंता फर्नांडिस याही उपस्थित होत्या.









