प्रतिनिधी / पणजी :
सत्ताधारी भाजपमधील बंडखोरी, भाजप नेत्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. अनेक मतदारसंघात उघडपणे तर कित्येक मतदारसंघात छुपी बंडखोरी भाजपला धक्का देणारी ठरणारी आहे. बंडखोरांना आवरण्यासाठी भाजपने आवश्यक त्या सर्व उपाययोजना हाती घेतलेल्या आहेत. उद्या दि. 7 मार्च रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्यातील एकूण 13 मतदारसंघात भाजपला थेट बंडखोरीला सामारे जावे लागणार आहे. त्याशिवाय सुमारे 1 डझन मतदारसंघात भाजपमध्ये छुपी बंडखोरी झाल्याची माहिती हाती आली आहे. सत्ताधारी पक्षामध्येच मोठय़ा प्रमाणात बंडखोरी झाल्याने पक्षीय पातळीवर निवडणूक लढविणे भाजपला महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
भाजप नेत्यांसाठी एका पेक्षा एक धक्के
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज सादर केल्याने भाजप नेत्यांसाठी एका पेक्षा एक धक्के सहन करावे लागत आहेत. बंडखोरांना आवरण्यासाठी भाजपने सर्व ती ताकद पणाला लावलेली आहे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी आपल्या सांकवाळमध्ये अनिता थोरात यांना बिनविरोध निवडून आणल्याने संभाव्य बंडखोरी टळली व भाजपवरचे संकटही टळले.
होंडय़ात भाजपचे ऍड. गावकर यांची बंडखोरी
सत्तरीत तीन मतदारसंघातील 10 उमेदवारांमध्ये होंडा मतदारसंघात काँग्रेसमधून आयात केलेले सगुण वाडकर हे भाजपचे उमेदवार आयत्यावेळी ठरल्याने तेथील निष्ठावंत भाजपचे ऍड. गावकर यांनी बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज सादर केला.
बाबू आजगांवकर, सोपटे यांच्यासमोर पेचप्रसंग
पेडणे तालुक्यातील चार मतदारसंघापैकी हरमलमध्ये रंगनाथ कलशावकर तर तोरसेमध्ये भारती सावळ यांनी बंडखोरी केल्याने भाजप नेते दयानंद सोपटे आणि मंत्री बाबू आजगांवकर यांच्यासमोर गंभीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मोरजीमध्ये छुपी बंडखोरी सुरु झाल्याचे वृत्त आले आहे.
डिचोली तालुक्यात दोन बंडखोर
डिचोली तालुक्यातील चारपैकी मयेमध्ये भाजपनेते व माजी सभापती अनंत शेट यांचे बंधू प्रेमेंद्र शेट व लाटंबार्सेमध्ये प्रदीप रेवडकर या दोन भाजप नेत्यांनी बंडखोरी केली आहे.
उसगाव भाजपध्ये दोन गट
फोंडा तालुक्यात जिल्हा पंचायतींचे एकूण सात मतदारसंघ येतात. यातील बोरीमध्ये भाजपच्या पूनम सामंत यांनी बंडखोरी केली आहे. उसगावमध्ये मूळ भाजपच्या गटाने उमेदवार उभा केला. त्यालाच काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. उसगावात भाजपमध्ये दोन तट पडलेले आहेत.
सालसेतमध्ये नऊपैकी दोनच ठिकाणी भाजपचे उमेदवार
सालसेतमधील बरेच भाजप आमदार आपापल्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार देखील उभे करु शकले नाहीत. मंत्री फिलीप नेरी यांनी वेळ्ळीत अपक्ष व नुवेमध्ये बाबाशान या भाजप आमदाराने अपक्ष उमेदवार उभे केले. गिरदोली व दवर्ली या दोनच मतदारसंघात भाजपने आपले उमेदवार उभे केले. केपेतील बार्सेमध्ये भाजपची बंडखोरी झाली आहे. सांगेतील रिवणमध्ये भाजपचे भावेश जांबावलीकर यांनी बंडखोरी केलेली आहे. सावर्डेमध्ये तर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्या मेव्हणे प्रदीप देसाई यांनी भाजपला रामराम ठोकून मगो पक्षात प्रवेश केला.