आझमगडमध्ये सुभासप अध्यक्षांची प्रचारसभा
सुहेलदव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी आझमगढ येथील प्रचारसभेत भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. भाजप सरकार हे देशविरोधी असून लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही सर्व एक झालो आहोत. भाजपने देशाला लुटण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
देशाची भूमी विकू देणार नसल्याची शपथ पंतप्रधान घेतात, परंतु आता बीएसएनएल, वीज विभाग, रेल्वे सर्वकाही विकण्यात आले आहे. शेतकऱयांनी संघर्ष करत कृषी कायदे मागे घेण्यास सरकारला भाग पाडले, अन्यथा देशाच्या शेतकऱयांची भूमी देखील उद्योजकांना विकण्यात आली असती. देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही सर्वजण समाजवादी पक्षासोबत उभे ठाकलो आहोत असे उद्गार राजभर यांनी काढले आहेत. समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. तसेच गंभीर आजारांसाठी देखील मोफत उपचाराची व्यवस्था करण्यात येईल. भाजप सरकार गोशाळेच्या नावावर कोटय़वधींची लूट करत असतान भटकी गुरे शेतकऱयांच्या पिकांची हानी करत आहेत. कोरोना लसीच्या नावावर कोटय़वधींचा गैरव्यवहार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.









