प्रदेशाध्यक्षालाच स्वतःच्या गोटात केले सामील
उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सप आघाडीत सामील कृष्णा पटेल यांच्या पक्षाला भाजपने मोठा झटका दिला आहे. भाजपने कृष्णा पटेल यांचा पक्ष अपना दल (कमेरावादी)चे प्रदेशाध्यक्ष राजवन सिंह पटेल यांनाच स्वतःच्या गोटात सामील केले आहे.
भाजपच्या लखनौ कार्यालयात अनेक पक्षांमधून आलेल्या नेत्यांनी मोदी-योगींच्या धोरणांनी प्रभावित होत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात सर्वात मोठे नाव अपना दल कमेरावादी पक्षाची साथ सोडून आलेले राजवन सिंह पटेल यांचे आहे. राजवन सिंह पटेल हे पेंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांची आई कृष्णा पटेल यांचा पक्ष अपना दल (कमेरावादी)चे मातब्बर नेते राहिले आहेत. ते सध्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. दीर्घकाळापासून अपना दल (के)ला मजबूत करण्यासाठी ते कार्यरत होते.
तर काँग्रेसचे माजी खासदार कमल किशोर यांची सून प्रियंका किशोर यांनीही भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. बसप नेते राजेश तिवारी, शिखा मिश्रा यांच्यासह अन्य अनेक पक्षांचे नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. जनता पक्षाचे माजी आमदार अशफाक यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. या नेत्यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजपचे वरिष्ठ नेते लक्ष्मीकांत वाजपेयी उपस्थित होते.
दोन टप्प्यांमधील मतदानानंतर समाजवादी पक्षात निराशा पसरली आहे. एकीकडे मतदान भाजपच्या बाजूने झाले असून मुस्लीम भगिनींनी यात मोठय़ा प्रमाणावर भाग घेतला आहे. मतदानामुळे सप नेत्यांना घाम फुटला असल्याचे उद्गार भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनी काढले आहेत.
राजवन सिंह पटेल यांनी सोनेलाल पटेल आणि त्यांच्या आईसोबत काम केले होते. परंतु त्यांच्याकडे उमेदवारीसाठी पैसे मागण्यात आले होते. याचमुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राजवन सिंह पटेल हे तळागाळाशी जोडले गेलेले नेते असल्याचे स्वतंत्र देव यांनी म्हटले आहे.
या नेत्यांचा भाजप प्रवेश
अपना दल (के)चे प्रदेशाध्यक्ष राजवन सिंह पटेल
काँग्रेसच्या माजी खासदारांची सून प्रियंका किशोर
जनता पक्षाचे माजी आमदार अशफवक
बहुजन समाज पक्षाचे नेते सुनील राव
शिखा मिश्रा, माजी मिस उत्तराखंड
प्रगतिशील समाजवादी पक्षाचे राजनारायण सिंह
बसपचे माजी नगरसेवक राजेश तिवारी
राष्ट्रीय लोकदलाचे श्याम बिहारी यादव
बहुजन समाज पक्षाचे शरद पांडे
सामाजिक कार्यकर्त्या मीनू तिवारी
स्वामी दयाल गौड









