प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरातील वाढत असलेल्या भटक्या कुत्र्यांचा त्रास आणि धोका कमी व्हावा यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने रेबीज लसीकरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याला सोमवारी प्रारंभ झाला. राजारामपुरी भागातील भटक्या कुत्र्यांना पकडून रेबीजची लस देण्यात आली. तसेच त्यांच्या गळ्यात पट्टेही बांधण्यात आले.
गेल्या काही वर्षात शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहराच्या उपनगरातही भटक्या कुत्र्यांची वाढणारी संख्या स्थानिक नागरिकांसाठी आणि लहान मुलांसाठी धोकादायक बनली आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी होण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत. यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा ही समावेश असल्याने धोका आणखी वाढला आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याबरोबरच त्यांचा धोका कमी व्हावा यासाठी महापालिकेने उपाययोजना कराव्या अशी वारंवार मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांना रेबीजची लस देण्याची मोहीम सुरू केली आहे.
सोमवारी राजारामपुरीतून या मोहिमेला प्रारंभ झाला. दहा डॉग कॅचरच्या मदतीनेच्या मदतीने विविध भागात जाऊन कुत्र्यांना पकडण्यात आले. तसेच त्यांना रेबीजचे इंजेक्शन देऊन त्यांच्या गळ्यात पट्टाही बांधण्यात आला.
अशी आहे मोहीम
भटक्या कुत्र्याला पकडल्यानंतर तो नर आहे की मादी आहे याची तपासणी केली जाते. त्याचे निर्बीजीकरण केले आहे की नाही हे देखील तपासले जाते. त्याचबरोबर आजारी असल्यास संबंधित कुत्र्याला उपचारासाठी दाखल केले जाते. रेबीजची लस दिल्यानंतर कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधला जातो. त्यामुळे मोहीम पूर्ण झाल्यानंतर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या किती आहे हे बांधलेल्या पट्यांच्या संख्येवरून स्पष्ट होणार आहे. महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील, सोसायटी फॉर ?निमल प्रोटेक्शन या संस्थेचे डॉ. चंद्रहास कापडी आरोग्य निरीक्षक विनोद नाईक यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
रेबीजची लस दिल्याने भटकी कुत्री पिसाळ न्याचे प्रमाण कमी होणार आहे. त्याचबरोबर पिसाळलेले कुत्रे इतर कुत्र्यांना चावल्यास त्यातून रेबीजचा प्रादुर्भाव वाढणार नाही.
पस्तीस रुपयाची लस आणि पट्टा
एका कुत्र्याला देण्यात येणाया रेबीज च्या लसीची किंमत सुमारे पस्तीस रुपये आहे. त्यासाठी महापालिकेने निधीची तरतूद केली आहे. मात्र कुत्र्याच्या गळ्यात बांधण्यात येणारे पट्टे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वतीने महापालिकेला मोफत देण्यात आले आहेत.
शहरात असणाया सर्व भटक्या कुत्र्यांना अँटी रेबीजची लस देण्याबरोबरच त्यांची संख्याही मोजण्यात येत आहे. मोहीम पूर्ण झाल्यानंतर भटक्या कुत्र्यांची संख्या समजण्यास मदत होणार आहे.- डॉ. विजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी कोल्हापूर महापालिका