राज्यपाल पिल्लाई यांचे प्रतिपादन
पणजी प्रतिनिधी
भगवद्गीता आणि तिचा संदेश बालपणातच प्रत्येकापर्यंत सोप्या भाषेत पोचवण्याचे काम हे राष्ट्रीय महत्त्वाचे आहे, असे उद्गार गोव्याचे राज्यपाल पी. एस्. श्रीधरन पिल्लाई यानी कृतार्थ, म्हार्दोळ च्या वतीने प्रकाशित श्लोकबद्ध मराठी गीतासार या पुस्तिकेचे लोकार्पण करताना काढले. काल दोनापावला येथे राजभवनात एका छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.
अठरा अध्यायांतून जीवनाचे सखोल तत्त्वज्ञान मानवजातीच्या कल्याणार्थ प्रस्तुत करणारी भगवद्गीता ही धनुर्धारी अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातील संवाद रूपात असून जगभरात ती विविध भाषांतून उपलब्ध आहे. पण कृतार्थ तर्फे प्रकाशित केवळ अठरा श्लोकांत रचलेले मराठीतील गीतासार लहान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, आणि त्या अर्थाने ती अभिनव अशी कृती ठरते. या श्लोकबद्ध गीतापाठासाठी सहाय्यक ठरणारी ऑडिओ आणि व्हीडिओ क्लिप कु. तन्वी कुमार जांभळे आणि सिद्धी उपाध्ये यांच्या आवाजात तयार करण्यात आली असून हा पूर्ण संच मुद्रित पुस्तिकेतील क्मयू आर कोड वरून कुणालाही वापरणे शक्मय होईल.
पुस्तिकेसाठी प्रस्तावना डॉ. सौ. अपर्णाताई पाटील यानी लिहिली असून व्हीडिओ चित्रण अनिल अध्यापक आणि अमोघ बर्वे यांचे आहे.
कृतार्थ, म्हार्दोळ ने यंदा आठव्या वर्षात पदार्पण केले असून गेल्या सात वर्षात संस्कृति संवर्धनार्थ, लोकसंचित संवर्धनार्थ, निसर्ग साधना, निर्मल साधना अशा नांवांनी विविध लोकोपयोगी व जागृतिपर उपक्रम सातत्याने चालवले आहेत. यातील काहींची दखल शैक्षणिक संस्था, वैद्यकीय तज्ञ, सामाजिक संस्था, देवालये यांनी घेऊन कृतार्थच्या कल्पकतेचे व समाजाभिमुखतेचे कौतुकही केले. प्रसार माध्यमांतूनही कृतार्थच्या उपक्रमशीलतेचा उल्लेख वेळोवेळी झाला आहे.
आठव्या वर्षाचा शुभारंभी उपक्रम म्हणून हे मराठी श्लोकबद्ध गीतासार दहा हजार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याची कृतार्थची योजना आहे. याच पुस्तिकेचे लोकार्पण महामहीम राज्यपालांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी या उपक्रमाचे एक मार्गदर्शक श्री. लक्ष्मण पित्रे (निवृत्त संचालक, गोवा राज्य वस्तुसंग्रहालय), डॉ. सुब्रह्मण्य भट ( प्राचार्य, स्वामी विववेकानंद महाविद्यालय, बोरी) आणि कृतार्थचे श्री. राजेंद्र देसाई उपस्थित होते.









