भक्तिमहात्म्य सांगताना भगवंत म्हणाले, कीर्तनाची गोडी पाहून मी वैकुंठाहून अत्यंत आनंदाने झपाटय़ाने उडी घालतो. कीर्तनाप्रमाणेच माझे पूजन करण्यालाही अत्यंत महत्त्व आहे हे लक्षात घेऊन तो माझे गरुडध्वजाचे पूजनही भक्त मोठय़ा आदराने करतो. सुगंधित पुष्पादिकांच्या सामग्रीने घवघवीत पूजा बांधतो. ह्याप्रमाणे अत्यंत नि÷sने व सावधानतेने माझे पूजन करून माझे स्तुतिस्तोत्रही गात राहतो. माझ्या सेवेमध्ये आदर ठेवतो. मला साष्टांग नमस्कार करतो. माझ्या भक्तांची पूजा विशेष रीतीने करतो आणि सर्व प्राण्यांमध्ये मला पाहतो. अत्यंत आवडीने तो अंतर्बाह्य मलाच विकलेला असतो पण माझे भक्त पाहताक्षणीच त्याला इतका आनंद होतो की, त्या आनंदाच्या भरात तो माझ्याकडे यायलाच विसरतो. माझे भक्त मोठय़ा भाग्यानेच घरी येत असतात. त्या वेळी तोच दिवाळी दसऱयाचा सण म्हणून तो समजतो. भक्तपूजेची आवडी पाहण्याकरिता सनकादिकांच्यासुद्धा उडय़ा पडतात. नारद, प्रल्हादादिक भक्तांच्या झुंडीच्या झुंडी धावत येतात. त्या ठिकाणी असंख्य सिद्ध गोळा होतात. मोठमोठय़ा देवांचे तर पेवच फुटते. महात्म्यांचे थवेच्या थवे दाटतात व पितर धापा टाकीत धावत येतात. वेदांचा तर तेथे रिघावच होत नाही. विधिविधाने लाजून मागेच फिरतात. ह्याप्रमाणे माझ्या भक्ताच्या पूजेच्या कौतुकाने दारापुढे गर्दीच गर्दी उसळते. मोठय़ा उत्कर्षानं माझ्या भक्ताची केलेली पूजा पाहून मला कृष्णालासुद्धा भुरळ पडते. माझी पूजाही मागे टाकून जो माझ्या भक्ताची प्रेमाने पूजा करितो, त्याने माझी श्रीकृष्णाची सकललोकांसहवर्तमान सहपरिवार पूजा केली म्हणून समजावे. माझ्या प्रतिमा या अचेतन व्यक्ति व भक्त म्हणजे माझ्या बोलत्या चालत्या मूर्ती होत. तेव्हा त्यांची यथासांग पूजा केली असता मला संतोष होतो. जसा मद्भाव माझ्या भक्तांच्या ठिकाणी ठेवावयाचा, तसाच भाव सर्व भूतांमध्येही धरावयाचा कारण भूताकृती जरी निरनिराळी असली, तरी त्या सर्वांमध्ये आत्मस्थिती अविकारच असते.
निखारे पाहिले असता एक लांबट, एक वाकडा, एक वाटोळा, असे निरनिराळय़ा आकाराचे दिसतात पण अग्नि मात्र एकच असतो. त्याचप्रमाणे सर्व प्राणिमात्र मत्स्वरूपच आहेत. भिंतीवरच्या चित्रांमध्ये पाहू गेले तर निरनिराळय़ा आकृती दिसतात पण त्यामध्ये भिंत जशी एकच असते, त्याप्रमाणे मी चिदात्मा सर्व प्राणिमात्रात भरलेला आहे हेच निजभावाने निश्चित समजावे. दुसरी गोष्ट ही की, दुजेपणाचा अहंकार सोडून देऊन सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी माझीच भावना धरणे ही माझी सर्वात श्रे÷ पूजा होय आणि मला श्रीकृष्णाला तीच अत्यंत प्रिय आहे. अशा रीतीने जो माझी पूजा करतो, तो मला अत्यंत आवडता होतो मी सर्वांगाने त्याच्या घरी राबतो कारण मी त्याचा दास झाल्यामुळे त्याचे माझ्यावर स्वामित्व असते. त्याची जी जी कांही कृती असते, ते ते माझे भजनच होते. आपले सर्व व्यवहार तो फक्त माझ्यासाठीच करतो. वाणीने माझ्याच गुणांचे वर्णन करतो आणि आपले मन मलाच अर्पण करून सर्व कामना सोडून देतो. लौकिक कर्म असो अथवा इतर कोणतेही शारीर कर्म असो, त्या कर्मद्वारा माझी भक्ती त्याच्या मनात उत्पन्न होते. उद्धवा! माझ्या भजनाचे स्वरूप मोठे नवलाईचे आहे ! ते तुला किती म्हणून सांगावे ? तो भक्त चव्हाटय़ावर बसून चकाटय़ा पिटीत राहिला, तरीसुद्धा त्यात माझे कीर्तन उत्पन्न होते. त्याची रसाळ वाणी मद्गुणगायनाने गर्जना करते. तो स्वधर्मकर्मक्रिया करतो, तीही मलाच अर्पण करतो. मला सोडून अणुमात्रही दुसरे कांही करावयाचे त्याला कळत नाही. त्याच्या साऱया इंद्रियांच्या कर्मात माझी भक्ती आपोआप उत्पन्न होते. माझ्या नामाशिवाय किंवा गुणानुवादाशिवाय त्याच्या वाणीला रिकामे राहावयाचे ठाऊकच नसते.
त्याच्या मनाला जे जे कांही आवडते, ते ते तो मलाच अर्पण करतो आणि शेवटी त्याचे मनच तो मलाच वाहून टाकतो. त्यामुळे त्याचे विचार करणेच बंद होऊन जाते.
क्रमशः







