साप्ताहिक सुटी असल्याने नोकरदारांचा हिरमोड
प्रतिनिधी / बेळगाव
दुरुस्तीच्या कारणास्तव शहर व ग्रामीण भागातील काही गावांमध्ये रविवारी दिवसभर वीजपुरवठा ठप्प होता. सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. रविवारची सप्ताहिक सुटी असूनही लाईट नसल्यामुळे नोकरदारांचा हिरमोड झाला. जनरेटरच्या साहाय्याने बाजारपेठेतील दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. यामुळे सर्वत्र जनरेटरची घरघर ऐकायला मिळत होती.
वीज व्यवस्थेमध्ये वारंवार बिघाड होत असल्यामुळे वीजपुरवठा ठप्प होत आहे. मागील आठवडाभरात मुख्य वीज केंद्रात बिघाड झाल्याने विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे दुरुस्ती करण्याचा निर्णय हेस्कॉमने घेतला. रविवारी कारखाने, सरकारी कार्यालये, खासगी कार्यालये बंद असल्याने दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे सकाळपासूनच वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. हेस्कॉमने पूर्वसूचना दिल्यामुळे लाईट जाण्यापूर्वीच नागरिकांनी मोबाईल तसेच इलेक्ट्रिक उपकरणे चार्ज करून ठेवली होती.
बेळगावच्या बाजारपेठेतही वीजपुरवठा नसल्याने अनेकांनी दुकाने उघडलीच नाहीत. यामुळे सायंकाळपर्यंत बाजारात तुरळक गर्दी पाहायला मिळाली. कोल्ड्रिंक तसेच विजेवर चालणाऱया इतर व्यवसायांना याचा फटका बसला. बेळगाव शहराबरोबरच काकती औद्योगिक वसाहत, येळ्ळूर, धामणे, राजहंसगड, नंदिहळ्ळी या परिसरातही वीजपुरवठा रविवारी ठप्प होता.









