पंतप्रधान बोरिस जॉन्सन कामावर परतले : जगभरात 2,07,391 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू
जगात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 2 लाख 07 हजार 391 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 लाख 08 हजार 196 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना संसर्गावर मात केल्यावर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पहिल्यांदाच डाउनिंग स्ट्रीटमध्ये दिसून आले आहेत. ब्रिटनमधील टाळेबंदी अद्याप हटविली जाणार नाही. लोकांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचे उद्गार जॉन्सन यांनी काढले आहेत.
अमेरिका : निर्बंध हटविणार

अमेरिकेत मागील 24 तासांमध्ये 1,331 जणांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी बळींचा आकडा कमी झाला आहे. अमेरिकेतील मिनिसोटा, कोलोराडो, मिसिसिपी, मोंटाना आणि टेनेसी या प्रांतांमधून निर्बंध हटविले जाणार आहेत. न्यूयॉर्क पोलीस विभागाच्या दोन अधिकाऱयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
क्यूबाची 22 देशांना मदत

क्यूबाचे 200 पेक्षा अधिक डॉक्टर्स आणि परिचारिका सोमवारी दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्या आहेत. महामारीच्या प्रारंभापासूनच क्यूबाने अनेक देशांमध्ये वैद्यकीय पथके पाठवून मदत केली आहे. क्यूबा सरकारने आतापर्यंत इटली, मेक्सिको, अंगोला, जमैका, व्हेनेझुएला समवेत 22 देशांमध्ये आरोग्य कर्मचारी पाठविले आहेत.
सिंगापूरमध्ये 799 नवे रुग्ण

सिंगापूरमध्ये मागील 24 तासांत 799 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये बहुतांश जण वर्क परमिटवर काम करणारे विदेशी नागरिक आहेत. हे सर्वजण डोरमेट्रीमध्ये वास्तव्यास आहेत. सरकारने डोरमेट्रीतील कामगारांना हलविले आहे. कामगारांची चाचणी करण्यासह लक्षणे दिसून येणाऱया रुग्णांना हलविले जात आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार सिंगापूरमध्ये 13 हजार कोरोनाबाधित आहेत. दक्षिणपूर्व आशियात हा आकडा सर्वाधिक आहे.
न्यूझीलंडमध्ये निर्बंध शिथिल

न्यूझीलंडमध्ये मध्यरात्रीपासून टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. देशात सद्यकाळात 4 लेव्हल लॉकडाउन असून त्याची पातळी आता 3 वर आणली जाणार आहे. न्यूझीलंडमध्ये लॉकडाउन कायम राहणार असले तरीही काही गोष्टींकरता सूट दिली जाणार आहे. न्यूझीलंडमध्ये टेकअवे सेवा सुरू केली जाणार आहे. तसेच लोकांना सागरस्नानाचा आनंद घेता येणार आहे.
चीनमध्ये केवळ 3 नवे रुग्ण

चीनमध्ये मागील 24 तासांमध्ये केवळ 3 नव्या रुग्णांची पुष्टी मिळाली आहे. या तीनपैकी 2 जण विदेशातून आलेले नागरिक असल्याची माहिती नॅशनल हेल्थ कमिशनने दिली आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता 82 हजार 830 झाली आहे. देशात आतापर्यंत 4,633 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 77,400 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. वुहानच्या रुग्णालयांमध्ये दाखल सर्व रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
जपान : प्रवासबंदी वाढणार

जपान सरकार 29 एप्रिलपासून कोरोनाने ग्रस्त आणखीन 14 देशांवर प्रवासबंदी लादणार आहे. या नव्या निर्बंधांनंतर जपानकडून कोरोनामुळे प्रवासबंदी लागू करण्यात आलेल्या यादीत 87 देशांचा समावेश होईल. यात अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपमधील बहुतांश देश सामील आहेत.
ब्रिटन : निर्बंध शिथिल होणार

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन 7 मेपासून टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेऊ शकतात. कोरोना प्रतिबंधक तज्ञांनी सहमती दिल्यास जॉन्सन यासंबंधीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 20,732 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर 1 लाख 52 हजार 840 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
मशिदी खुल्या होणार?

इराणमधील ज्या भागांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे, तेथील मशिदी खुल्या करण्याचा विचार केला जात असल्याची माहिती राष्ट्रपती हसन रुहानी यांनी रविवारी दिली आहे. रुग्ण तसेच मृतांच्या संख्येच्या आधारावर येलो, रेड आणि व्हाइट क्षेत्रांमध्ये देशाची विभागणी करत त्यानुसारच निर्बंध लादले जातील.
इटलीतही स्थिती सुधारली

इटलीत 4 मेपासून प्रवासविषयक निर्बंधांप्रकरणी दिलासा दिला जाणार आहे. लोकांना उद्यानांमध्ये जाण्याची अनुमती मिळणार असल्याची घोषणा पंतप्रधान ग्युसेप कोंटे यांनी केली आहे. पंतप्रधानांनी लोकांना सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. इटलीत मागील 24 तासांमध्ये 260 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा 14 मार्चपासून सर्वात कमी ठरला आहे.
सौदी अरेबिया-चीन यांच्यात करार

सौदी अरेबिया आणि चीनने रविवारी महामारीची तपासणी वाढविण्यासाठी करार केला आहे. या करारामुळे सौदी अरेबियात विषाणू संसर्गाचा शोध घेण्याच्या क्षमतेत वृद्धी होणार आहे. 26.5 कोटी डॉलर्सच्या या करारांतर्गत चीन 90 लाख कोरोना किट तसेच अन्य उपकरणांचा पुरवठा करणार आहे. तसेच चीनचे 500 वैद्यकीय तज्ञ सौदी अरेबियात पोहोचणार आहेत.









