महिलांच्या 100 मीटर्स बटरफ्लायमध्ये मॅगी विजेती
ब्रिटनचा ऍडम पिटी पुरुषांच्या 100 मीटर्स ब्रेस्टस्ट्रोक ऑलिम्पिक चॅम्पियन ठरला. टोकियो ऍक्वेटिक्स सेंटरवरील या इव्हेंटमध्ये त्याने इतिहासातील सर्वात पाचवी वेगवान वेळ (57.37 सेकंद) वेळ नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली. पिटी हा माजी विश्वविक्रमवीर असून आपल्या या सिग्नेचर इव्हेंटमध्ये 58 व 57 सेकंद वेळेत सर्वप्रथम पूर्ण करण्याचा विक्रम त्याने नोंदवला आहे.
सोमवारी नेदरलँड्सच्या ऍर्नो कॅमिंगाने 58.00 सेकंद वेळेसह रौप्य तर इटलीच्या निकोलो मार्टिनेंघीने 58.33 वेळेसह कांस्यपदक पटकावले. अमेरिकेचा मायकल ऍन्डय़्रू 58.84 सेकंद वेळेसह चौथ्या स्थानी राहिला. एखाद्या अमेरिकन स्पर्धकाला पदकाने हुलकावणी देणारी ही सलग दुसरी फायनल ठरली.
महिलांच्या 100 मीटर्स बटरफ्लायमध्ये मॅगी मॅकनिलने सुवर्णपदकाची कमाई केली. विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन मॅगीने 55.59 सेकंद वेळेत हा इव्हेंट पूर्ण करत अव्वलस्थान संपादन केले. चीनची झँग युफेई 55.64 सेकंद वेळेसह दुसऱया स्थानी राहिली. ऑस्ट्रेलियाची इम्मा मॅकॉन 55.72 सेकंद वेळेत इव्हेंट पूर्ण करत कांस्यपदकाची मानकरी ठरली. अमेरिकन टिनेजर टोरी हस्केला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.
वास्तविक, शेवटच्या 10 मीटर्सचे अंतर बाकी असताना टोरीने उत्तम वेग घेतला होता. पण, फायनल स्टोक्समध्ये तिला वेग कायम राखता आला नाही आणि अन्य प्रतिस्पर्ध्यांना याचा लाभ घेता आला. स्वीडनची विद्यमान चॅम्पियन व वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर साराह स्जोस्ट्रॉम सातव्या स्थानी राहिली.









