वृत्तसंस्था/ दोहा
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या कतार खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ब्रिटनचा माजी टॉप सीडेड अँडी मरेने एकेरीची अंतिम फेरी गाठताना सर्बियाच्या लिहेकाचा उपांत्यफेरीत पराभव केला.
गेल्या वषीच्या जून महिन्यानंतर अँडी मरेने एटीपी टूरवरील स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. मरेने यापूर्वी तीन वेळा ग्रॅण्डस्लॅम अजिंक्मयपदे मिळविली आहेत. शुक्रवारी या स्पर्धेतील झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात वाईल्डकार्डधारक अँडी मरेने झेकच्या लिहेकाचा 6-0, 3-6, 7-6 (8-6) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता मरे आणि रशियाचा तृतीय मानांकित मेदवेदेव्ह यांच्यात अंतिम सामना खेळविला जाईल. शुक्रवारच्या उपांत्य सामन्यात मरेने पाच मॅच पॉईंट्स वाचवत विजय नोंदविला. रशियाच्या तृतीय मानांकित मेदवेदेव्हने उपांत्यफेरीच्या सामन्यात कॅनडाच्या द्वितीय मानांकित फेलिक्स ऑगेर ऍलिसीमेवर 6-4, 7-6 (7-5) अशी मात करत अंतिम फेरी गाठली.









