अपात्र लाभार्थ्यांचा केला सर्व्हे- अन्न व नागरी पुरवठा खात्याची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
शासनाला खोटी माहिती पुरवून अनधिकृत रेशनकार्ड मिळविणाऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनधिकृत रेशनकार्ड कमी करण्यासाठी सर्व्हे करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्टय़ा सक्षम असूनदेखील खोटी माहिती पुरवून अंत्योदय, बीपीएल रेशनकार्ड घेतलेल्या कार्डधारकांना सरकारने दणका दिला आहे. 85 हजार अपात्र लाभार्थ्यांचा सर्व्हे करून डाटा जमा करण्याचे काम हाती घेण्यात आले.
काही अपात्र लाभार्थी अंत्योदय व बीपीएल अंत्योदय कार्डे मिळवून रेशनचा लाभ घेत आहेत. यामुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडत आहे. याकरिता खात्याकडून अनधिकृत रेशनकार्डे कमी केली जाणार आहेत. शिवाय काही लाभार्थ्यांचा मृत्यू होऊनदेखील नावे कमी झाली नाहीत. अशांची नावे कमी केली जाणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून कारभार पारदर्शी करण्यासाठी बोगस रेशनकार्ड रद्द करण्याचे काम हाती घेतले आहे. शिवाय निधन झालेल्या रेशनकार्डधारकांचा तपास घेण्यात आला आहे. त्यांच्या नावाने धान्य घेण्यात येत होते. सदर पुरवठा स्थगित करण्यात आला आहे. शिवाय अपात्र ठरलेल्या काही लाभार्थींचा एपीएलमध्ये समावेश करण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱयांनी आपली नावे वगळून कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने बीपीएल कार्डे मिळविली आहेत. अशांनी तातडीने आपली रेशनकार्डे परत करावीत, अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.









