प्रतिनिधी /बेळगाव
वेंगुर्ला रोडवरून पुणे-बेंगळूर महामार्गाला शहराबाहेरून जोडण्यात आलेल्या बॉक्साईट रोडवर खड्डय़ांचे साम्राज पसरले आहे. मागील दोन दिवसात झालेल्या धुवाधार पावसाने या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी भरल्याने रात्रीच्या वेळी ते निदर्शनास येत नसल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले असल्याने वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरातील एक महत्वाचा रस्ता म्हणून ओळख असणाऱया बॉक्साईट रोडवर खड्डे पडले आहेत. पावसाळय़ापूर्वी डागडुजी करणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनचालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हिंडाल्को येथील ब्रिजजवळ पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. बसव कॉलनी येथेही अनेक ठिकाणी रस्त्याशेजारी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वेंगुर्ला महामार्गावरून येणारी वाहने शहरात न येता शहराबाहेरून जावीत यासाठी बॉक्साईट रोडचा वापर केला जातो. पुणे-बेंगळूर महामार्गाला जोडण्यात आल्याने या मार्गावर अवजड वाहनांची संख्या सर्वाधिक असते. परंतु खड्डय़ांचे प्रमाण वाढल्याने अवजड वाहने चालविणे कठिण झाले आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात का होईना रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.









