ऑनलाईन टीम / बैरुत :
लेबननची राजधानी असलेल्या बैरूतमध्ये मंगळवारी सायंकाळी दोन भीषण स्फोट झाले. या स्फोटात 78 जण ठार झाले, तर 4000 हून अधिक जण जखमी झाल्याचे लेबननच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. लेबननचे पंतप्रधान हसन दिआब यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
बैरूतमध्ये स्फोट नेमके कशामुळे झाले याची माहिती अद्याप समजू शकली नाही. अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरातच हे भीषण स्फोट झाले. या स्फोटाचा आवाज एखाद्या बॉम्बस्फोटप्रमाणे होता. या स्फोटामुळे तेथील जमिनीला तडे गेले. गगनचुंबी इमारती जमीनदोस्त झाल्या. अनेक इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. संपूर्ण शहरासह 10 किमीच्या परिसरात या स्फोटाचे हादरे जाणवले.
बैरुत शहराच्या बंदर क्षेत्रात झालेल्या स्फोटाचा जोर शहराच्या मोठ्या भागात जाणवला. त्यानंतर काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला. दरम्यान, बेरुतमधील भारतीय दुतावासाने स्थायिक भारतीयांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. कुणीही घाबरुन जाऊ नये, जर कुणाला मदत हवी असेल तर हेल्पलाईन नंबर देण्यात आले आहेत.