विद्यार्थ्यांची गैरसोय, बसफेऱया वाढविण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्रामीण भागातील प्रवाशांना अपुऱया आणि अनियमित बससेवेचा फटका बसत आहे. शहरापासून 25 किलो मीटर अंतरावर असलेल्या बाकनूर गावची बससेवादेखील विस्कळीत झाल्याने परिसरातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. मागील काही दिवसांपासून बसफेऱया कमी झाल्याने बेळवट्टी, बडस, बिजगर्णी गावातील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
परिसरातील शेकडो विद्यार्थी दररोज ये-जा करत असतात शाळा पूर्ववत सुरु झाल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत बसफेऱया कमी असल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी बसपास असून देखील आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे बसफेऱया वाढून बससेवा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे. शाळा, महाविद्यालय सायंकाळी सुटल्यानंतर यंदे खूट बसथांब्यावर विद्यार्थ्यांची गर्दी होते. त्यामुळे परिसरातील विद्यार्थी बसमध्ये चढतात आणि बाकनूरच्या विद्यार्थ्यांना गर्दीमुळे बसथांब्यावर थांबावे लागते. त्यामुळे इतर बसच्या प्रतीक्षेत थांबावे लागते. त्यामुळे रात्री उशिराने विद्यार्थी घरी पोहोचत आहेत. त्यामुळे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे. याकरिता परिवहनने सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत बेळगाव-बाकनूर बसच्या फेऱया वाढवाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.
लॉकडाऊनपासून नियमित बस धावत नसल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत थांबावे लागत आहे. तसेच बसफेऱया कमी झाल्याने बसला गर्दी वाढत आहे. त्यामुळे या भागात बसफेऱया वाढवून बससेवा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.









