प्रतिनिधी /बेळगाव

शुक्रवारी बेळगाव महानगरपालिकेच्या 58 वॉर्डांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. बेळगाव शहरातील उत्तर भागातही मतदानासाठी नागरिकांचा उत्साह दिसून आला. मराठीसोबतच उर्दू व कानडी भाषिक नागरिकांनी चुरशीने मतदान केले. दुपारपर्यंत मतदानासाठी उत्साह दिसून आला. त्यानंतर मात्र मतदान केंद्रांवर शांतता असल्याचे चित्र पहायला मिळाले.
जयनगर, विजयनगर, सहय़ाद्रीनगर येथे शांततेत मतदान
वॉर्ड क्र. 31 मध्ये येणाऱया विजयनगर, जयनगर, कुवेंपूनगर व सहय़ाद्रीनगर या भागात शांततेने मतदान झाले. जयनगर येथील मतदान केंद्रावर सकाळी 9.30 पर्यंत 7 टक्के मतदानाची नोंद झाली होती. सकाळी 10 नंतर दुपारपर्यंत या वॉर्डमध्ये चांगल्या पद्धतीने मतदान झाले. परंतु बऱयाच मतदारांची नावे वॉर्ड क्र. 32 मध्ये आल्यामुळे काहीशी गेंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या मतदान केंद्रावर सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
चव्हाट गल्ली येथे 59.64 टक्के मतदान
चव्हाट गल्ली येथील वॉर्ड क्र. 8 साठी मराठी मुलांची शाळा क्र. 5, सेंट्रल हायस्कूल व बीएड कॉलेज येथे मतदान केंद्र होते. या ठिकाणी 3895 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या प्रभागात 59.64 टक्के मतदान झाले. चव्हाट गल्ली येथील मतदान केंद्राबाहेर सर्वच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी उमेदवारांचे समर्थक घरोघरी जाऊन मतदान झाले की नाही याची चौकशी करीत होते.
वॉर्ड क्र. 13 मध्ये मतदानासाठी तुफान गर्दी
शिवाजीनगर येथील वॉर्ड क्र. 13 मध्ये मतदानासाठी तुफान गर्दी झाली होती. शाळा क्र. 27 तसेच जिआयई नर्सरी शाळा या मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली होती. मराठी सोबतच कन्नड व उर्दू भाषिक नागरिक मोठय़ा संख्येने मतदान केंदाबाहेर जमा झाले होते. वीरभद्रनगर येथील बॅरिकेड्सजवळ मोठय़ा प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांना ही गर्दी हुसकावावी लागली.
कणबर्गी येथे काटे की टक्कर
कणबर्गी येथील वॉर्ड क्र. 47 व 55 या दोन्ही वॉर्डांमध्ये काटे की टक्कर पहायला मिळाली. वॉर्ड क्र. 47 मध्ये भाजप व अपक्ष उमेदवारांमध्ये निवडणुकीची रंगत होती. मराठीसह कन्नड भाषिक नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावत मतदान केले. यासह वॉर्ड क्र. 55 मध्ये भाजप, काँग्रेस व अपक्षांमध्ये लढत झाली. सिद्धेश्वर हायस्कूल येथे मतदानासाठी मतदारांची तुफान गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
वॉर्ड क्र. 3 मध्ये बोगस मतदान झाल्याने काहीकाळ गोंधळ
वॉर्ड क्र. 3 साठी माळी गल्ली, वन विभागाचे कार्यालय व बाशिबन शाळेमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली. माळी गल्ली येथील शाळा क्र. 4 मध्ये निवडणूक अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणामुळे काही जणांनी बोगस मतदान केल्याचा प्रकार समोर आला. मतदान असणारी व्यक्ती मतदानासाठी मतदान केंद्रावर आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर उमेदवारांनी यावर आक्षेप घेतला. काहीकाळ अधिकारी व नागरिकांमध्ये बाचाबाचीही झाली. कामत गल्ली, आझाद गल्ली, माळी गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, मेणसे गल्ली, कसई गल्ली या परिसरातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण या प्रभागात 50 टक्के मतदान झाले.
खंजर गल्ली येथे मतदान केंद्रासमोर तुफान गर्दी
वॉर्ड क्र. 1 मध्ये येणाऱया खंजर गल्ली येथील मतदान केंद्राबाहेर सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांची तुफान गर्दी झाली होती. इतर मतदान केंद्रांबाहेर शुकशुकाट असताना या मतदान केंद्राबाहेर मात्र मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनाही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागले. दुपारनंतर या परिसरातील नागरिक मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास मतदान केंद्राबाहेर गर्दी झाली होती.
वॉर्ड क्र. 18 मध्ये 1 तास उशिरापर्यंत मतदान
वॉर्ड क्र. 18 मध्ये नेहरुनगर, रामनगर, अयोध्यानगर, सुभाषनगर हा परिसर येतो. मराठा मंडळ पॉलिटेक्निक येथील मतदान केंद्रावर दुपारनंतर मतदान प्रक्रिया अत्यंत संथगतीने पार पडली. यामुळे सायंकाळी 7 वाजेपर्यंत या मतदान केंद्रावर मतदान चालले. या प्रकारामुळे उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱयांच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला. या प्रभागात एकूण 60 टक्के मतदान झाले.
भडकल गल्ली येथील वॉर्ड क्र. 5 साठी मतदान
वॉर्ड क्र. 5 साठी भडकल गल्ली, शेट्टी गल्ली येथील मतदान केंद्रांवर मतदान झाले. सायंकाळपर्यंत 51.50 टक्के मतदारांनी मतदान केले. 5790 मतदारांपैकी 2994 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भडकल गल्ली येथील मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बऱयाच वर्षांपासून इतर गावांमध्ये स्थायिक झालेल्या नागरिकांचेही नाव मतदारयादीत आल्यामुळे त्यांना शोधून मतदान करण्यासाठी आणेपर्यंत उमेदवारांच्या नाकीनऊ आले.









