बेंगळूर : कन्नड अभिनेता संचारी विजय शनिवारी रात्री दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर बेंगळूरच्या अपोलो इस्पितळात उपचार सुरू होते. मात्र, त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर ब्रेनडेथ झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, विजयच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी सकाळपर्यंत मूत्रपिंड, यकृत आणि डोळे काढून अन्य गरजूंना प्रत्यारोपण केले जाणार आहेत.
विजयला मृत घोषित करण्यात आल्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांकडे हस्तांतर केला जाणार आहे. मंगळवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत रविंद्र कलाक्षेत्र सभागृहात अंतिम दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शनिवारी रात्री अभिनेता विजय आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताला अपघात झाला होता. बेंगळूरच्या जे. पी. नगर येथे ही घटना घडली होती. विजयच्या डोक्याला जबर मार बसला होता.









