आरएफओकडे ग्रा. पं. विरुद्ध जागा मालकांची तक्रार
प्रतिनिधी/ बेळगाव
बेनकनहळ्ळी येथील आनंदवन रोडवरील मालकी जागेतील झाडे बेनकनहळ्ळी ग्रा. पं. च्यावतीने बेकायदेशीररीत्या तोडण्यात आल्याची तक्रार जागेच्या मालकांनी वन खात्याच्या अधिकाऱयांकडे केली आहे. तक्रार केल्यानंतर हे काम थांबविण्यात आले आहे. मालकी जागेतील झाडे तोडण्याचा अधिकार ग्रा. पं. ला कोणी दिला, असा प्रश्न जागेच्या मालकांनी उपस्थित केला आहे. रस्ता कामाचे कारण सांगून ग्रा. पं. वतीने विविध झाडांची कत्तल सुरू असल्याचेही जागा मालकांनी सांगितले.
बेनकनहळ्ळी-आनंदवन मार्गावर अनेक जणांनी जागा घेतली आहे. बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीस जागेचा रितसर कर भरणाही आपण करत असल्याचे जागा मालकांनी सांगितले. मात्र, सर्व्हे न करताच रस्ताकाम करण्याचे कारण सांगून ग्रा. पं. वतीने विविध झाडे तोडली आहेत. शनिवारी हा प्रकार समजताच जागा मालकांनी धाव घेऊन हा प्रकार थांबविण्यास सांगितले. या प्रकाराबाबत वन खात्याच्या (आरएफओ) अधिकाऱयांकडे तक्रार केली आहे. तक्रारीनंतर झाडे तोडण्याचे काम बंद करण्यात आले आहे.









