बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर पुलकेशी नगरचे आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांनी डी. जे. हळ्ळी हिंसाचार प्रकरणी माजी महापौर संपतराज याची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. आरोपी संपतराज फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संपतराज हा आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांचे घर जाळण्यात आणि हिंसक घटनांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांनी पत्रकार परिषदेत बोलताना संपतराज निर्दोष असल्यास त्यांना पळ काढावा लागणार नाही. उलट, त्यांनी तपासामध्ये केंद्रीय गुन्हे शाखेला (सीसीबी) सहकार्य करणे गरजेचे आहे. आमदार मूर्ती यांनी केजी हळ्ळी आणि डीजे हळ्ळी या हिंसक घटनांमध्ये संपतराजचा हात असल्याचे त्याने आधीच सांगितले होते. याबाबत पोलीस महासंचालक प्रवीण सूद आणि पोलिस आयुक्त कमलपंत यांना लेखी तक्रारही करण्यात आली आहे.
जिवे मारण्याचा कट
या भागातून कॉंग्रेसचे तिकिट मिळवण्यासाठी संपतराजने त्यांची हत्या करण्याचा कट रचला होता. निवासस्थानाला आग लावताना ते घरी नव्हते. कुटुंबातील सदस्यांनी जीव वाचविण्यासाठी घराच्या छतावरून उडी घेतली. या घटनेत त्याच्या हातापायांची हाडे मोडली आहेत. आगीमुळे किमान १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हंटले.
संपतराज यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी
आमदार मूर्ती यांनी आपण कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याशी संपर्क साधून संपतराजला पक्षातून काढून टाकण्याची मागणी करणार असल्याचे म्हंटले. संपतराजसारखे आरोपी पक्षात ठेवल्याने पक्षाची प्रतिमा खराब होईल. संपतराजला सी. व्ही. रमण नगर विधानसभा मतदार संघातून तिकीट देण्यात आले आणि पराभवाला सामोरे जावे लागले होते.