तिघांची टोळी गजाआड : केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरमध्ये बनावट नोटा खपविणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असून शनिवारी केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी 2 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यांची सखोल चौकशी केली असता लॉकडाऊन कालावधीत या नोटा तयार केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणण्यात येत असल्याचा सुगावा लागताच सीसीबी पोलिसांच्या पथकाने छापा टाकून तिघांना अटक केली. त्यांच्याजवळून 2 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अराफतनगर येथील जमाल आणि पादरायनपूर येथील इम्रान व मुबारक अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
ऑटोरिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे आरोपी पोलिसांच्या जाळय़ात अडकले आहेत. शुक्रवारी ऑटोरिक्षातून जाणाऱया जमालने रिक्षाचालकाला 100 रुपयांची बनावट नोट दिली. त्यामुळे संशय आल्याने रिक्षाचालकाने त्याला विल्सन गार्डन पोलीस स्थानकात आणले. नोटेची पडताळणी केल्यानंतर ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले. जमालने दिलेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी इम्रान आणि मुबारक या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून बनावट नोटा तयार करण्याची मशिन, कागद, 2000, 200 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. आरोपी बेंगळूरमध्ये चार ठिकाणी बनावट नोटांची छपाई करत होते, अशी माहिती उपलब्ध झाली असून याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे. विल्सन गार्डन स्थानकाचे पोलीस निरीक्षक शंकराचारी यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.









