नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी लसीचा तिसरा बूस्टर डोस घेण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन आयसीएमआरने केले आहे. बूस्टर डोसच्या आवश्यकतेचा कोणताही शास्त्रीय पुरावा मिळालेला नाही, असे या संस्थेचे प्रमुख संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पत्रकारांकडे स्पष्ट केले.
भारताकडे लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असून सज्ञान वयाच्या (18 वर्षांवरील) प्रत्येक व्यक्तीला दोन मात्रा देऊन त्याचे लसीकरण पूर्ण केल्यानंतर बूस्टर डोससंबंधी विचार करण्यात येईल, असे विधान केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. सरकारची सध्याची प्राथमिकता प्रत्येक सज्ञान नागरीकाला लसीच्या दोन मात्रा देणे हे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यासंबंधात डॉ. भार्गव बोलत होते. आयसीएमआर यासंबंधी लवकरच बैठक घेणार असून त्यात बूस्टर डोसची चर्चा होणार आहे. तथापि, सध्या बूस्टर डोसची आवश्यकता दाखविणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. नंतर आवश्यकता निर्माण झाल्यास त्यासंबंधी विचार होऊ शकतो, असे काही तज्ञांनीही स्पष्ट केले आहे.









