गोडोली / प्रतिनिधी :
सातारा शहर आणि परिसरात जीवन प्राधिकरणकडून होणारा पाणी पुरवठा बुधवार (दि.२७) आणि गुरुवार (२८) रोजी कमी दाबाने होणार आहे. मंगळवार दि.२६ रोजी देखभाल व दुरुस्तीची कामे होणार असल्याचे अधिक्षक अभियंता पल्लवी चौगुले यांनी सांगितले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून जाहीर निवेदनाद्वारे मंगळवार दि. २६ ऑक्टोबर रोजी देखभाल व दुरुस्ती कामासाठी विसावा जलशुद्धीकरण केंद्राकडून पोवईनाका येथील मुख्य पाणी साठवण टाकीकडे होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान शाहुपुरी, शाहूनगर परिसर, गोडोली, पोवईनाका, अजिंक्य कॉलनी, करंजे परिसर, तामजाई नगर , सदरबाजार, कांगा कॉलनी, लक्ष्मी टेकडी, जवान सोसायटी, कोयना सोसायटी, दौलत नगर या भागातील पाणी पुरवठा होणार असलेल्या ग्राहकांना दि.२६ रोजी पाणी पुरवठा होवू शकणार नाही. दि. २७ व २८ ऑक्टोबर रोजी कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होणार आहे. तरी सर्व पाणी ग्राहकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून होणाऱ्या गैरसोयी बाबत प्राधिकरणास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे .