प्रतिनिधी/ सातारा
शहरात लसीकरणाचा वेग वाढावा व लसीकरण मोहिम शंभर टक्के पुर्ण व्हावी हा उद्देश समोर ठेऊन शहरात विविध ठिकाणी कोरोना प्रतिबंधक महालसीकरण मोहिम राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या मोहिमेस मंगळवारी सुरूवात झाली असुन पहिल्या दिवशी शहरातील विविध अशा 13 ठिकाणी व बुधवारी 10 ठिकाणी मोहिम पार पडली. बुधवारी एकुण 2हजार 694 नागरिकांना लस देण्यात आली यामध्ये परिला डोस 2हजार 57 व दुसरा डोस 637 नागरिकांना देण्यात आला.
पुर्वी शहरात प्रामुख्याने जिल्हा रूग्णालय व कस्तुरबा रूग्णालयातच केवळ ही लस देण्यात येत होती. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांची एकच गर्दी होत होती. त्यातच कित्तेकदा लसच उपलब्ध नसल्याने नागरिकांना तासंतास रांगेत थांबुन माघारी फिरावे लागत होते. याचीच दखल घेत सध्या जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सातारा पालिकेच्या संयुक्त विद्यमाने महालसीकरण मोहिम राबविण्यात आली आहे. यावेळी प्रत्येक केंद्रावर पहिल्या व दुसऱया डोसचे 150 असे एकुण दोन्ही लसीचे 300 डोस उपलब्ध होते. मंगळवारी एकुण 2 हजार 389 तर बुधवारी एकुण नागरिकांना लस देण्यात आली. बुधवारी नागरी आरोग्य केंद गोडोली, समाजमंदिर मल्हार पेठ, कूपर कॉलनी सांस्कृतिक हॉल सदर बाझाल, महाजनवाडा सांस्कृतिक कार्यालय मंगळवार पेठ, नगरपालिका मंगल कार्यालय केसरकर पेठ, मराठा जिमखाना व्यंकटपुरा पेठ, श्रीपतराव हायस्कूल करंजे सातारा, भावे बोळ समाजमंदिर शनिवार पेठ, नागरी आरोग्य केंद्र कस्तुरबा, नगरपालिका ग्रंथालय सदर बाझार या केंद्रावर सदर महालसीकरण मोहिम पार पडली.









