वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाची (बीसीसीआय) 30 सप्टेंबर रोजी बोलाविण्यात आलेली वार्षिक सर्वसाधारण बैठक कोरोना महामारी परिस्थितीमुळे बेमुदत लांबणीवर टाकण्यात आली असून ही बैठक ऑनलाईनद्वारे घेतली जाणार नाही, अशी घोषणा मंडळाच्या प्रवक्त्याने शुक्रवारी केली आहे.
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाची ही वार्षिक सर्वसाधारण बैठक लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती मंडळाशी संलग्न असलेल्या विविध राज्यांच्या क्रिकेट मंडळाना कळविली असल्याचे मंडळाचे सचिव जय शहा यांनी सांगितले. तामिळनाडू सोसायटीज 1975 च्या नोंदणी नियमानुसार भारतीय क्रिकेट मंडळाची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. प्रत्येकवर्षी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक 30 सप्टेंबरपूर्वी घेतली जाते. पण कोरेना परिस्थिती बिकट होत असल्याने सदर बैठक बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मंडळाची यापूर्वीची शेवटची वार्षिक बैठक 2019 च्या ऑक्टोबरमध्ये घेण्यात आली होती आणि या बैठकीत सौरभ गांगुलीने मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती.









