अमेरिका पाठविणार नाही स्वतःचे अधिकारी- चीन संतप्त
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
बीजिंगमध्ये होणाऱया हिवाळी ऑलिम्पिक 2022 मध्ये स्वतःच्या अधिकाऱयांना पाठविणार नसल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर आक्षेप घेत चीनने प्रत्युत्तरादाखल कारवाईची धमकी दिली आहे. अमेरिकेचे हे कृत्य राजनयिक दृष्टय़ा प्रक्षोभक कारवाई असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी म्हटले आहे.
2028 मध्ये अमेरिकेच्या लॉस एंजिलिस शहरात ऑलिम्पिकचे आयोजन होणार आहे. खेळाला राजकारणात ओढण्याच्या कृतीचे आपण विरोध करतो असे चीनने म्हटले आहे. चीनमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या मुद्दय़ावरून तेथे आयोजित होणाऱया स्पर्धेवर राजनयिक बहिष्काराचा विचार चालविला असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. शिनजियांग प्रांतातील अल्पसंख्याक मुस्लिमांच्या नरसंहाराचा मुद्दा अमेरिकेने उपस्थित केला होता.
ऑलिम्पिकच्या उद्घाटन आणि समारोप सोहळय़ात अमेरिकेकडून एक शिष्टमंडळ पाठविले जाते, पण यावेळी राजनयिक बहिष्काराच्या अंतर्गत अमेरिकेकडून शिष्टमंडळ पाठविले जाणार नाही. अमेरिकेच्या खासदारांनी राजनयिक बहिष्काराच्या निर्णयाला समर्थन दर्शविले आहे. तर वॉशिंग्टनमधील चीनच्या दूतावासाने यावर त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करणे टाळले आहे.
बायडेन प्रशासन कुठल्याही राजनयिक किंवा अधिकृत शिष्टमंडळाला बीजिंग ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक गेम्समध्ये पाठविणार नाही. शिनजियांग प्रांतात उइगुर मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आल्याचे व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी सांगितले.
हिवाळी ऑलिम्पिक सुरू होण्याच्या दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेने ही घोषणा केली आहे. परंतु या क्रीडास्पर्धेत अमेरिकेचे खेळाडू भाग घेणार असल्याचे मानले जात आहे. बायडेन प्रशासन केवळ स्वतःच्या राजनयिक प्रतिनिधीला या स्पर्धेकरता पाठविणार नाही. शिनजियांगमधील चिनी कारवाईला अमेरिकेने ‘नरसंहार’ ठरविले आहे.









