मुलींचे लैंगिक शोषण प्रकरण
नवी दिल्ली
बिहारच्या 17 निवारा केंद्रांमधील मुलींचे लैंगिक शोषण तसेच छळाप्रकरणी लवकरच 25 जिल्हादंडाधिकारी तसेच 46 अन्य अधिकाऱयांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणी तपास करणाऱया सीबीआयने सर्व शासकीय अधिकाऱयांच्या विरोधात विभागीय कारवाईची शिफारस करत बिहारच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे.
अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणावर या पत्रात प्रकाश टाकण्यात आला आहे. सीबीआयने अन्य 52 जण तसेच स्वयंसेवी संस्थांना तत्काळ काळय़ा यादीत समाविष्ट करून त्यांची नोंदणी रद्द करण्याची शिफारस केली आहे. सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख आहे. 17 निवारा केंद्रांचा तपास पूर्ण झाला असून संबंधित न्यायालयांमध्ये अहवाल सादर करण्यात आल्याचे सीबीआयने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्यायालयाने मुजफ्फरपूर निवारा केंद्रासह अन्य 16 केंद्रांचा तपास करण्याचा आदेश सीबीआयला दिला होता.









