पंतप्रधान मोदींना विश्वास : वैद्यकीय-अभियांत्रिकी शिक्षण मातृभाषेतून देण्याचेही सुतोवाच
वृत्तसंस्था/ सासप्राम
वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मातृभाषेतून शिकवण्याचा निर्णय घेणार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील पहिल्या प्रचारसभेत केली. तसेच बिहारमध्ये रालोआचेच सरकार येणार अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-संजद युतीच्या प्रचाराला सुरुवात केली. सासाराममध्ये त्यांची पहिली सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमारही सभेत उपस्थित होते. मोदींनी भोजपुरीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी दिवंगत रामविलास पासवान आणि रघुवंश प्रसाद सिंह यांना श्रद्धांजलीही वाहिली.
देशाच्या शिक्षणव्यवस्थेत बिहारचा इतिहास गौरवशाली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणातून प्रेरणा घेऊन आता वैद्यकीय, अभियांत्रिकीसह सर्व तांत्रिक अभ्यासक्रमही मातृभाषेत शिकवण्याचा प्रयत्न असेल, असे सुतोवाच करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा वर्गाला पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. तसेच बिहारमध्ये भाजप, संजद आणि मित्र पक्षांचेच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय. अनेक सर्वेक्षणात रालोआचीच सत्ता येणार हे स्पष्ट झाल्याचे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी रोहतास येथील पहिल्या प्रचारसभेच्या माध्यमातून शुक्रवारी बिहारमधील जनतेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. बिहारमधील ‘लालटेन’चा जमाना गेला. आज येथे रस्ते, वीज, सर्वकाही आहे. बिहारी लोक न घाबरता राहत आहेत. ज्यांचा इतिहास बिहारला बिमारु बनवण्याचा आहे, त्यांना जवळपासही फिरु न देण्याचे आता हय़ा जनतेने ठरवले आहे’, अशा शब्दात मोदी यांनी लालूप्रसाद यादव यांच्या शरसंधान साधले.
सासाराम येथे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासमवेत सभा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी गया येथे पोहोचले. तेथे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी देखील व्यासपीठावर उपस्थित होते. गयामध्येही महाआघाडीच पंतप्रधान मोदींच्या निशाण्यावर होती. आजच्या बिहारमध्ये कंदीलची गरज नाही, आता विजेचा वापर वाढू लागला आहे, असा टोला मोदींनी मारला. आमिष दाखविणाऱयांपासून जागरुक राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.









