ऑनलाईन टीम / पटना :
बिहारमधील भागलपूरमध्ये गुरूवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली असून, अन्य 2-3 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भागलपूरचे डीआईजी सुजीत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भागलपूरमध्ये तारापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरूवारी भीषण स्फोट झाला. यात एक तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली. तर इतर बैठी घरं आणि कच्चे बांधकाम असलेल्या दोन-तीन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तारापूर पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने ढिगाऱयाखालून सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. काही जण जखमी आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अन्य काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, सध्या घटनास्थळी जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, स्फोट झालेल्या इमारतीत अवैध दारूगोळा आणि फटाके तयार करीत असल्याचा परिसरातल्या अनेकांना संशय होता. त्या दारुगोळ्यातूनच हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून, त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.









