प्रादेशिक आयुक्त आदित्य अमलान बिस्वास यांच्यावर जबाबदारी, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
प्रतिनिधी/ बेळगाव
गैरकारभारामुळे रोगग्रस्त बनलेल्या बिम्स (सरकारी वैद्यकीय महाविद्यालय) वर उपचार करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. कडक शिस्तीचे व प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेले प्रादेशिक आयुक्त आदित्य अमलान बिस्वास यांची बिम्स्च्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्वतः मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी शुक्रवारी दुपारी ही घोषणा केली आहे.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच बिम्सच्या कारभारावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा शुक्रवारी बेळगावला आले होते. जिह्यातील आमदार, खासदार, मंत्री व वरिष्ठ अधिकाऱयांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या मदतीने कर्नाटकात कोरोना थोपविण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. प्रत्येक ग्राम पंचायतींना 50 हजार रुपये देण्यात आले आहे. त्यामुळे गाव पातळीवर कोरोना थोपविण्यासाठी उपाय योजना हाती घेता येणार आहे. सध्या ऑक्सीजनचा तुटवडाही दूर होत आहे. बेळगाव जिह्यातील लोकप्रतिनिधींनीही कोरोना थोपविण्यासाठी उत्तम कामगिरी केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शनिवारी कर्नाटकाला मोठ्या प्रमाणात कोरोनावरील लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दुसऱया डोसला लवकरच सुरुवात होणार आहे. बेळगावात कोरोना नियंत्रणात येत आहे. ही टक्केवारी 5 टक्क्मयांवर उतरली पाहिजे. बाधितांवर उपचार करण्याबरोबरच प्रत्येक खेड्यापाड्यात रॅपीड व आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे. 1172 गावांमध्ये तपासणी केली जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जिह्यात 304 कॉन्सट्रेटर्स उपलब्ध आहेत. रुग्ण सेवेसाठी त्याचा उपयोग होणार आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. तेथील गैरसोयींवर बैठकीत आढावा घेण्यात आला असून परिस्थिती सुधारण्यासाठी प्रादेशिक आयुक्त आदित्य अमलान बिस्वास यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
चिकोडी येथेही आरटीपीसीआर तपासणी
सध्या बेळगाव येथे आरटीपीसीआर तपासण्या केल्या जातात. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेवून चिकोडी येथेही आरटीपीसीआर तपासणी सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बिम्स् प्रशासनाला हादरा
प्रादेशिक आयुक्त आदित्य अमलान बिस्वास यांच्यावर बिम्स प्रशासनाची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर बिम्स्मधील प्रस्तापितांना हादराच बसला आहे. शुक्रवारी सकाळी सांबरा विमानतळावर आगमन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बिम्स्वर आयएएस अधिकाऱयाची नियुक्ती करणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आढावा बैठकीनंतर आदित्य अमलान बिस्वास यांचे नाव जाहीर करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमधील सेवा सुधारावी, उपचारासाठी येणाऱया गरीब, मध्यमवर्गीयांना उत्तम दर्जाची सेवा मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने बैठका घेवून प्रयत्न केले आहेत. बळ्ळारी येथील खाण माफियांचे कारणामे खणून काढण्यात ते आघाडीवर होते. बळ्ळारीचे जिल्हाधिकारी असताना खाण व्यवसायात गुंतलेल्या सत्ताधाऱयांची कुंडलीच त्यांनी बाहेर काढली होती. नेहमी गरीब, मध्यमवर्गीयांच्या हिताचा विचार करणाऱया व कसल्याही प्रकारच्या राजकीय हस्तक्षेपाला थारा न देता सेवा बजाविणाऱया आदित्य अमलान बिस्वास यांच्या नियुक्तीने बिम्स्मधील कामचुकाऱयांना हादरा बसला आहे. तरुण भारतने प्रादेशिक आयुक्तांशी संपर्क साधून प्रशासकपदाचा पदभार कधी स्वीकारणार? अशी विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांनी आताच घोषणा केली आहे. यासंबंधीचा आदेश येताच आपण पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रादेशिक आयुक्त पदाबरोबरच बिम्स् प्रशासकीय अधिकाऱयांची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.