पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांचे आवाहन, जिह्यातील 550 नमुने निगेटिव्ह
बर्ड फ्लू बाबतच्या गैरसमजातून पोल्ट्री व्यवसायिकांना फटका
प्रतिनिधी / कोल्हापूर
चिकन खाल्ल्यामुळे बर्ड फ्ल्यू होत नाही. त्यामुळे नागरिकांनी बिनधास्तपणे चिकन खावे असे आवाहन कोल्हापूरचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर वाय.ए. पठाण यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी आणि पोल्ट्री व्यवसायिकांनी स्वतः चिकन खात, चिकन खाल्ल्यामुळे बर्ड फ्लू होत नसल्याचे सांगितले. याशिवाय आत्तापर्यंत कोल्हापूर जिह्यातील 550 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हे सर्व नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती देखील पठाण यांनी दिली.
चिकन खाल्यामुळे कोरोना होतो या एकाच अफवेमुळे, पोल्ट्री व्यवसायीक शेतकऱयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आता तर चिकन खाल्ल्यामुळे बर्ड फ्लू होत असल्याची चर्चा असली तरी, नागरिकांनी मनामध्ये कोणतीही भीती, शंका न बाळगता बिनधास्तपणे चिकन खावे असे आवाहन कोल्हापूरचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर वाय.ए. पठाण यांनी केले. चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होत असल्याच्या अफवेमुळे अनेकांनी आपल्या जिवंत कोंबडÎा अक्षरशा खड्डयामध्ये गाडून टाकल्या. तर अनेक पोल्ट्री व्यवसायीक शेतकऱयानी जिवंत कोंबड्या 10 ते 20 रुपयांनी विक्री केल्या. कोरोनाचे संकट टळत असताना आता चिकन खाल्ल्यामुळे बर्ड फ्लू होत असल्याचा गैरसमज पसरविण्यात येत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिक शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक अडचणीत आलेत. मात्र 70 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत चिकन शिजवल्यास त्यामध्ये बर्ड फ्लूचा अथवा कोणताही इतर आजाराचा विषाणू राहत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही मनामध्ये शंका न बाळगता बिनधास्तपणे चिकन खावे असे उपायुक्त डॉक्टर पठाण यांनी स्पष्ट केले.
चिकनचा निश्चित केला जाणार रेडिरेकनर
याशिवाय सध्या कोंबडीचे लहान पिल्ले 40 ते 45 रुपयाला खरेदी केले जाते. हेच पिल्ले मोठे करेपर्यंत त्याला किमान अडीचशे रुपये खर्च येतो. मात्र बर्ड फ्लूच्या भीतीने कोंबड्यांना मागणी नसल्याने याच कोंबड्या 40 ते 45 रुपयेला विक्री केल्या जात आहेत. चिकनचे दर कमी झाले असले तरी हॉटेलमधील चिकन आणि चिकन पासून बनणारे खाद्यपदार्थांचे दर मात्र जैसे थे आहेत. त्यामुळे लवकरच यासंदर्भात जिल्हाधिकाऱयांचे मार्गदर्शन घेवून, पोल्ट्रीच्या ठिकाणचे दर आणि विक्री दुकानातील दर या संबंधी रेडीरेकनर बनविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे पठाण यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विनोद पवार, सहाय्यक आयुक्त डॉक्टर अशोक नाईक, डॉक्टर एस बी भरते, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शाम लुद्रिक, पोल्ट्री उद्योजक समीर मुल्ला, उत्तम रेडेकर आदी उपस्थित होते.