वार्ताहर / बाळेकुंद्री
कोरोना विषाणूने ग्रामीण भागात हात-पाय पसरले आहेत. दररोज रुग्णांची संख्या वाढतच आहे. संकट काळात रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन बेळगाव जिल्हय़ातील ग्रामीण जनतेला तात्काळ रुग्णसेवा उपलब्ध व्हावी यासाठी बाळेकुंद्री खुर्द गावचे युवा नेते व ग्रा. पं. सदस्य शांत भीमराव चंदगडकर यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी स्वतः बेळगाव विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांना मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. बाळेकुंद्री गावात नुकत्याच झालेल्या लोकार्पण कार्यक्रमात सदर मोफत रुग्णवाहिका बेळगाव बजरंग दलाच्या पदाधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आली.
सदर रुग्णवाहिकेचा वापर ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांसाठी करण्यात येणार आहे. बाळेकुंद्री, सुळेभावी व परिसरातील बजरंग दल शाखेच्या कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामस्थांनी ग्रा. पं. सदस्य शांत चंदगडकर यांचे कौतुक करत ग्रामीण भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची सोय केली असून रुग्णांना वेळेत इस्पितळात पोहचविणे शक्य होणार आहे. गावच्या सेवेसाठी रुग्णवाहिका देऊन शांत यांनी मोठे सामाजिक कार्य केल्याचे गौरवोद्गार कार्यकर्त्यांनी काढले आहेत. ग्राम पंचायत व ग्रामस्थांतून त्यांचे कौतुक होत आहे.
सामाजिक बांधिलकी जपली : शांत चंदगडकर

ज्या समाजात जन्म घेतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना मनाशी बाळगून ग्रामीण भागातील बाधित रुग्ण इस्पितळात त्वरित हलविण्यासाठी कुटुंबाची परवड होत असते. त्यांना तात्काळ दवाखान्यात पोहचवावे यासाठी सामाजिक बांधिलकीतून रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून दिली असल्याचे समाधान वाटत असल्याचे शांत चंदगडकर यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.









