प्रतिनिधी/ कारवार
येथील जिल्हा रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेवेळी संशयास्पद मृत्यू झालेल्या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार रुपाली नाईक यांनी केली. येथील सर्वोदयनगरमधील गीता बानावळी (वय 30) या महिलेचे जिल्हा रुग्णालयात दुसरे बाळंतपण सुखरुपपणे 31 ऑगस्ट रोजी झाले होते. 3 सप्टेंबर रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेवेळी तिचा मृत्यू झाला होता. जिल्हा सर्जन शिवानंद कुडतळकर यांच्या दुर्लक्षामुळे आणि चुकीच्या उपचारामुळे बाळंतिणीचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी करून जोरदार निदर्शने केली. शनिवारी दोषी डॉक्टरावर कारवाई करावी या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर बृहत मोर्चा काढला होता.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी जि. पं. चे मुख्य कार्यदर्शी यांच्या नेतृत्त्वाखाली समितीची नियुक्ती केली असून दहा दिवसात अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. येथील लोकप्रतिनिधींनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
बाळंतिणीचा मृत्यू खेदकारक घटना
आमदार रुपाली नाईक यांनी, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्यावेळी बाळंतिणीचा मृत्यू होणे ही खेदकारक घटना आहे. तिचा मृत्यू कोणत्या कारणामुळे आणि कुणाच्या चुकीमुळे झाला याची कोणत्याही दबावाला बळी न पडता चौकशी झाली पाहिजे. दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करून मयत महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून दिला पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई केली तरच जनतेचा जिल्हा रुग्णालयावरील विश्वास वाढेल, असे पुढे नाईक यांनी स्पष्ट केले.
जिल्हा सर्जन यांच्यावर कारवाई करावी : चैत्रा कोठारकर
कारवार जि. पं. च्या सदस्या चैत्रा कोठारकर यांनी बाळंतिणीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या जिल्हा सर्जन डॉ. शिवानंद कुडतळकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गीता बानावळी हिचा मृत्यू सर्जन डॉ. शिवानंद कुडतळकर यांच्या बेजबाबदारीमुळेच झाला आहे. गरीब आणि मागासवर्गीय मच्छीमारी समाजातील गीता बानावळी या महिलेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉक्टर किंवा अन्य कर्मचाऱयांवर योग्य ती कारवाई करून न्याय मिळवून देण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.









