प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात चार दिवसांपूर्वी काळीज पिळवटून टाकणाऱया चार वर्षाच्या बालिकेवरील अत्याचार प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले. पोलिसांना घुमजाव करण्यासाठी आरोपी चोरीच्या गुन्हय़ात शरण आला होता. परंतु पोलिसांनी अत्याचार प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल करताच संकेतच्या वडिलांनीच अत्याचाराच्या घटनेला वाचा फोडली. आरोपीच्या वडिल व भावांनी मोठय़ा आपल्याच मुलाच्या दुष्कृत्याचा पाढा पोलिसांसमोर वाचला अन् नराधम संकेतच्या मुसक्या आवळल्या गेल्या. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले की, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या पटांगणात कुटुंबासमवेत झोपलेल्या पारधी समाजातील 4 वर्षाच्या बालिकेला दुचाकीवरुन घेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱया नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. इकडे सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला शोधण्यासाठी तब्बल 134 सीसीटीव्ही फुटेज तपासले. परंतु नराधमाने बलात्काराच्या गुह्यातून वाचण्यासाठी त्याच्यावर अगोदर दाखल असलेल्या जबरी चोरी गुह्यात तो शाहूपुरी पोलिसांना शरण गेला होता व तो न्यायालयीन कोठडीत होता. पोलिसांना शरण जाऊन त्यांनाच चकवण्याचा प्रयत्न आरोपी करत होता. मात्र सीसीटीव्ही क्लिप वायरल होताच यांचे वडील व भाऊ यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना फोन करून यांची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबुल केले. संकेत गुजर (वय 26, रा. तामजाईनगर करंजे सातारा) असे संशयित आरोपीचे नाव असून याबाबत महिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा शहरात मध्यवस्तीत शासकीय कार्यालयाच्या आडोशाला झोपलेल्या चिमुरडीला तिथून गाडीवर नेऊन तालुका हद्दीत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आणि एकच खळबळ उडाली.
या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाला होता. या चिमुरडीवर साताऱयात उपचार केल्यानंतर तिला पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलेली आहे. आरोपीला पकडण्याची मागणी संपूर्ण जिह्यातून जोर धरत होती. दोन दिवस उलटूनही आरोपी सापडत नव्हता. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी नराधमाचा शोध घेण्यासाठी जीवाचे रान करत होते. तो ज्या सीसीटीव्हीत दिसून आला ती फुटेज प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल करण्यात आली. यामुळे त्यांच्या भावानेही फुटेज वडिलांना दाखवल्याने हा आपलाच मुलगा असल्याने त्यांनी थेट पोलिसांना यांची माहिती दिली.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंडी वाहतूक करणाऱया जबरी चोरीच्या गुह्यातील तो आरोपी असून तो या गुह्यात पोलिसांना स्वतःहून शरण गेला आणि न्यायालयीन कोठडीत होता. दोन दिवसांपूर्वी सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीचे वर्णन जुळणारी व्यक्ती चक्क पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समोर आल्यावर पोलीस देखील चक्रावून गेले. बालिकेवर बलात्कार नराधमाचे नाव संकेत गुजर असून याची खात्री पटल्यानंतर त्याला बलात्काराच्या गुह्यात अटक करण्यात आली आहे. बालिकेवर बलात्कार करणारा हाच नराधम असल्याची खातरजमा झाल्यावर त्याला आता सातारा तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपी संकेतवर 17 गुन्हे दाखल…
बालिकेवर बलात्कार करणारा आरोपी संकेत हा जबरी चोरी, दरोडय़ाच्या गुह्यातील आरोपी आहे. तो अल्पवयीन असल्यापासून गुन्हे करत आहे. यामुळे सन 2013 ते 2016 या कालावधीत नाशिक येथील बालसुधारगृहात त्याला ठेवण्यात आले होते. तिथूनही तो पळून गेला व त्यांचा शोध घेतला असता तो पुण्यात सापडला. चार-पाच दिवसांपूर्वी भूविकास बॅँक येथील चौकात पिकअप गाडी चालकाला अडवून मारहाण करून दीडशे रूपयांना लुटणाऱया गुह्यात त्यांचा समावेश आहे. हा गुन्हा करून तो मोकाट फिरत होता. तोच रविवार सोमवारच्या मध्यरात्री त्याने 4 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केला. आतापर्यंत त्यांच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत.
वडिलांच्या एका फोनमुळे आरोपी संकेत जेरबंद
आरोपी संकेत हा सीसीटीव्ही गुह्यात कैद झाल्यानंतर पोलिसांनी ही सीसीटीव्ही क्लिप वायरल केली. ही वायरल क्लिप मोठय़ा प्रमाणावर सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांच्यामुळे घराघरात पोहोचली. तोच ही क्लिप संकेतच्या भावाने पाहिली व आपले वडील स्वरूप गुजर यांना दाखवली. त्यांनी हा तर आपला मुलगा आहे असे म्हणत तत्काळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना फोन लावला. आणि यांची माहिती दिली. पोलिसांनी तो शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीच्या गुह्यात पोलीस कोठडीत असल्याने तेथून त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता हा गुन्हा केल्याचे त्याने कबुल केले.








