प्रतिनिधी / बार्शी
महाराष्ट्र राज्य विधान परिषद च्या सदस्यांची निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाने जाहीर केली. त्यात पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची पुणे विभागाची निवडणुक जाहीर झाली. यात पुणे विभागातून शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघात उमेदवार निवडले जातात. या विधानपरिषदेच्या निवडणुकीची प्रकटीकरण निवडणूक आयोगाने केल्यानंतर तात्काळ राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी बार्शी नगरपरिषदेच्या मिळकत विभाग यांनी केलेली पाहायला मिळाली.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील प्रशासन अधिकारी शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत विभागाचे प्रमुख महादेव बोकेफोडे यांच्या नेतृत्वात असलेल्या टीमने ही आचारसंहितेची अंमलबजावणी पार पडली आहे. यावेळी मिळकत विभागाने बार्शी शहरांमधील सर्व लावलेले राजकीय डिजिटल बॅनर ठेवण्याची प्रक्रिया राबवली आहे.
तसेच विविध आमदार स्थानिक विकास निधी व खासदार स्थानिक विकास निधीतून झालेल्या कामांचे फलक झाकले आहेत. बार्शी नगर पालिकेच्या हद्दीतिल 50 डिजिटल बोर्ड, दहा झेंडे, 15 बॅनर असे दोन टिपर व बांधकाम विभागातील दहा कर्मचारी बांधकाम विभागातील अभियंता भारत विधाते यांच्या सहकार्याने काढण्यात आले. यावेळी मच्छिंद्र राऊत, बापू बनसोडे आदींनी परिश्रम घेतले.