प्रतिनिधी / बार्शी
बार्शीतील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पॉलिटेक्निक कॉलेज येथे कोरोना विलगीकरण कक्षात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
गळफास घेऊन आत्महत्या केलेली व्यक्ती चिखर्डे या गावची असून वय-३७ वर्षे असे नाव आहे. काही दिवसांपूर्वी आत्महत्याग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबातील आई, पत्नी आणि दोन मुले कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांना बार्शीतील पॉलिटेक्निक येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.
आज पहाटे फाशी घेतल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या समोर आले. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात कळविले. दरम्यान अद्याप गळफास कशामुळे घेतला त्याचे नेमके कारण समोर आलेले नाही, मात्र कोरोना या आजाराला कंटाळूनच त्यांने फाशी घेतल्याचे बोलले जात आहे.
कोरोना बाधित रुग्णांची आत्महत्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी या विलगीकरण केंद्रास भेट दिली त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, सदर कोरोना रुग्ण हा दोन दिवसांपासून मधुमेह त्रासाने त्रस्त होता. दोन दिवसांपूर्वी त्याचे समुपदेशन केले होते, मात्र त्याने आज फाशी घेऊन आपले जीवन संपवले आहे. घटनास्थळी तहसीलदार सुनील शेरखाने, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर आदींनी भेट दिली.