प्रतिनिधी/ म्हापसा
बार्देश तालुक्यात तुळशी विवाहास मोठय़ा उत्साहाने प्रारंभ झाला. ग्रामीण भागात तुळशी विवाहासाठी सर्वजण रंग कामात मग्न होते. कोविडचा काळ असून देखील काही गावामध्ये भटजी वगळता काहींनी घरोघरी स्वतः सोशल मिडियाद्वारे पाठवण्यात आलेल्या मंत्राने पूजा करणे पसंत केले. हा कोविड लवकरात लवकर बरा होवो अशी मागणी तुळशी वृंदावनाकडे केली. काणका येथे श्री विश्वाटी विश्वेश्वर शिवशंकर मंदिरात असलेल्या सार्वजनिक तुळशी वृंदावनाचा विवाह देवस्थानचे पुरोहित अनिल महाबळ यांच्याहस्ते हनुमंत साळगावकर यांच्या दांपत्याखाली पार पडला.
तुळशी विवाह ऐन कोविडच्या काळात आल्याने या काळात पुरोहित मिळणे काही गावात कठीण होऊन गेले. काही ठिकाणी पुरोहितांनी मोबाईलद्वारे मंत्र म्हणून सोशल मिडियावर त्याचे सर्वत्र प्रसारण करण्यात आले. सुवासिनींनी जोडवी पेटवून श्रींचा आशीर्वाद घेतला. सुवासिनींनी मोठय़ा उत्साहाने तुळशी वृंदावनासमोर रंगीबिरंगी रांगोळी घातली. विद्युत राषणाई करण्यात आली. तुळशी वृंदावन आकर्षक रंगाने विविध ठिकाणी सजविण्यात आलेले पहायला मिळाले. ऐन महागाईत आणि कोविडच्या काळात वार्षिक पारंपरिक तुळशी विवाह मात्र गावागावात उत्साहाने साजरा करताना पहायला मिळाले.









