वार्ताहर/ चिकोडी
कोरोनामुळे लांबलेल्या व विद्यार्थ्यांसाठी पालकांचे लक्ष लागलेल्या पीयुसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी लागला. या निकालात चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ाने गतवर्षीच्या 26 व्या स्थानावरून 20 व्या स्थानी झेप घेतली. यावर्षीच्या निकालात 3.02 टक्के वाढ झाल्याची माहिती प्रभारी डीडीपीयु एम. एम. कांबळे यांनी दिली.
जिल्हय़ात या परीक्षेसाठी बसलेल्या 28 हजार 541 विद्यार्थ्यांपैकी 16 हजार 494 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी कोरोनाच्या छायेतदेखील पदवीपूर्व शिक्षण खात्याने इंग्रजी विषयाचा पेपर घेत सर्वांना अचंबित केले होते. मंगळवारी सकाळी 11.30 वाजता प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांच्या उपस्थितीत संचालिका एम. कनगवल्ली यांनी हा निकाल जाहीर केला.
मुलींचीच बाजी
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील निकालामध्ये मुलींनी बाजी मारली. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे सरासरी प्रमाण हे 70.14 तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 48.20 टक्के इतके राहिले. परीक्षेला बसलेल्या 12 हजार 472 पैकी 8 हजार 748 विद्यार्थिनी व 16 हजार 69 पैकी 7 हजार 746 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचे कला विभागात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 60.45 टक्के, वाणिज्य विभागात 79.02 टक्के व विज्ञान विभागात 74.96 टक्के इतके आहे. तर मुलांचे कला विभागात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 35.45 टक्के, वाणिज्य विभागात 54.40 टक्के व विज्ञान विभागात 69.04 टक्के इतके आहे.
चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ातील निकालाची आकडेवारी पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा वरचढ ठरल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील परीक्षा दिलेल्या 13 हजार 89 विद्यार्थ्यांपैकी 7 हजार 636 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर शहरी भागातील परीक्षा दिलेल्या 15 हजार 452 विद्यार्थ्यांपैकी 8 हजार 858 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
वाणिज्य विभागाची आगेकूच
चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ातील वाणिज्य विभागात शिकणाऱया विद्यार्थ्यांची आगेकूच कायम राहिली आहे. वाणिज्य विभागाचा राज्याचा निकाल 65.52 टक्के तर चिकोडी जिल्हय़ाचा निकाल 66.36 टक्के इतका आहे. या विभागातून बसलेल्या 8 हजार 251 विद्यार्थ्यांपैकी 5 हजार 476 जण उत्तीर्ण झाले आहेत.
प्रतिक्रिया
निकालामुळे समाधान
चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ाने बारावीच्या निकालात जी सरस साधली आहे. त्याचे आपल्याला समाधान आहे. आपण उपसंचालक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर राबविलेल्या विविध उपक्रमांना विद्यार्थी, प्राध्यापक, पालकांनी प्रतिसाद दिल्याने चिकोडी जिल्हय़ाने प्रगती साधल्याची प्रतिक्रिया निवृत्त डीडीपीयु एस. डी. कांबळे यांनी दिली.









