प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यात पावसाळय़ातील निसर्गसौंदर्य आणि या भागातील कुसके व बामणबुडो धबधब्यांची मजा लुटण्यासाठी दरवर्षी गोव्याच्या विविध भागांबरोबरच देशी आणि परदेशी पर्यटक देखील गर्दी करत असतात. मात्र कोरोना महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी मागच्या वर्षी आणि यंदा देखील पर्यटकांनी या स्थळी शक्यतो गर्दी करू नये असे आवाहन केलेले असताना बामणबुडो धबधब्यावर जी शनिवारी आणि रविवारी गर्दी उसळते तो नवीन समस्यांना आमंत्रण तर देण्याचा प्रकार नाही ना, असा सवाल गावडोंगरीच्या सरपंच सुमन गावकर यांनी तसेच अन्य पंचायत सदस्यांनी केला आहे.
यापूर्वीच सरपंच गावकर यांनी या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालावी असे लेखी निवेदन संबंधिताना दिलेले आहे. तरी देखील सध्या लागू करण्यात आलेली संचारबंदी आणि सर्व नियम धाब्यावर बसवून विविध भागांतून आलेले युवक जो धांगडधिंगा घालतात त्याला आवर घालण्याची मागणी या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. दिवसभर स्वतःच्या वाहनांनी युवक-युवती या ठिकाणी गर्दी करत असून या प्रकारावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
या तालुक्यातील कुसके तसेच बामणबुडो धबधब्यांवर यंदा पर्यटकांना बंदी घालण्यात आल्याचे काणकोणच्या अभयारण्य विभागाचे क्षेत्रिय अधिकारी अनंत गावकर यांनी स्पष्ट केले होते. खोतीगावचे सरपंच दया गावकर यांनी देखील गावचे हित लक्षात घेऊन यंदा कुसके धबधबा पर्यटनासाठी बंद ठेवण्यासंबंधी लक्ष देण्याची मागणी उपसभापती इजिदोर फर्नाडिस यांच्याकडे केली आहे. कुसके धबधब्यावर येण्यासाठी अभयारण्य विभागाच्या परवान्याची गरज असताना या ठिकाणी देखील अन्य भागांतील लोक येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. ही गोष्ट अत्यंत गंभीर असल्याच्या प्रतिक्रिया सर्व भागांतून व्यक्त होत आहेत.









