प्रतिनिधी/ मंडणगड
मंडणगड तालुक्यातील बामणघर येथे होळीचा होम लावण्यासंदर्भात झालेल्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी पहाटे 2.45 च्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी कुंदन कडव, संजय गोठल, प्रीतेश गोठल, परेश गोठल, प्रथमेश गोठल, किरण कडव, प्रदीप खांबे, विशाल कडव (सर्व राहणार बामणघर) या 8 जणांविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात भादंवि कलम 143, 147, 149, 324, 323, 427, 269, 270, 504, 506 व 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत योगेश कृष्णा जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार रविवारी योगेश जाधव, विनेश साळवी, शैलेश जाधव, अमित साळवी, अभिजित साळवी (सर्व बामणघर मराठवाडी) हे सुनील धोंडगे यांच्या घरासमोरील रस्त्यावर गप्पागोष्टी करीत होते. त्याठिकाणी कुंदन कडव, संजय गोठल, प्रीतेश गोठल, परेश गोठल, प्रथमेश गोठल, किरण कडव, प्रदीप खांबे, विशाल कडव व ग्रामस्थ होळीचा होम लावण्याकरिता एकत्रित जमले होते. त्यांना विनेश साळवी व संदीप खांबे यांनी गावातील ग्रामस्थांनी पहाटे 3 वाजता होळीचा होम लावण्याबाबत ठरवलेले असल्याचे सांगितले. त्यावर याला विरोध दर्शवत विनेश साळवी यांना ‘तू कोण, होम किती वाजता लावायचा ते ठरवणार?, मी दुधेरे-बामणघर गावचा सरपंच आहे’ असे बोलून शिविगाळ करीत धक्काबुक्की केली. यावेळी योगेश जाधव व अन्य लोकांनी तुम्ही धक्काबुक्की का करता, अशी विचारणा केली असता त्यांनाही धक्काबुक्की करून ठोशाने मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, प्रीतेश गोठल याने हातातील लोखंडी कडय़ाने कृष्णा जाधव यांच्या कपाळावर मारून दुखापत केली. यावेळी झालेल्या झटापटीत कृष्णा जाधव यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुह्याचा तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.








