ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला ‘बाबा का ढाबा’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएंसर आणि यूट्यूबर गौरव वासनविरोधात पैशांचा घोटाळा केल्याची तक्रार दाखल केली आहे. कांता प्रसाद यांना पैसे देण्याचे आवाहन गौरव याने केले होते. ही पोस्ट खूप वायरल झाली. पण गौरवने कांता प्रसाद यांचा अकाऊंट नंबर न देता स्वत:चा अकाऊंट नंबर दिला होता. यामध्ये घोटाळा झाल्याचा संशय आहे.
बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांच्या संघर्षाची कहाणी सांगणारा व्हिडीओ गौरव वासनने बनवला होता. तो व्हिडिओ सोशल मीडियात खूप वायरल झाला. बाबा का ढाबा येथे लोकांनी गर्दी केली. आणि कांता प्रसाद यांनी बनवलेले जेवण काही मिनिटात संपू लागले. वासनने आपला व्हिडीओ बनवून ऑनलाईन शेअर केला आणि सोशल मीडियात पैसे देण्याचे आवाहन केले. हे करताना त्याने जाणूनबुजून स्वत:चा आणि स्वत:च्या ओळखीच्यांचा अकाऊंट नंबर दिल्याची तक्रार कांता प्रसाद यांनी पोलिसांत केली.
कांता प्रसाद यांना माहिती न देता मोठी रक्कम गोळा केली. कांता प्रसाद यांनी वारंवार पैशांबद्दल मागणी केली पण त्याने कोणतीही माहिती दिली नसल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
रविवारी मालवीर नगर पोलीस ठाण्यात तक्रार आली असून या प्रकरणाचा तपास पोलीस सध्या करीत आहेत. याप्रकरणी सध्या कोणतीही एफआरआय नोंदवण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.