अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार, 8 मे सकाळी 11.00
● शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात आढळून आले 2369 रुग्ण ●जिल्हाधिकाऱ्यांनी दिली नवीन दहा कोविड हॉस्पिलट्सना परवानगी ●प्रथमच साताऱ्यात लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल सुरु ●फलटणला लॉजमध्ये कोविड केंद्र सुरु ●लसीकरणानंतरही दररोजची औषधे सेवन बंद करु नयेत, विनय गौडा यांचे आवाहन ● संगममाहुलीकरांनी अंत्यसंस्कारासाठी केवळ पाच जणांची केली सक्ती ●क्षेत्रमाहुलीत आरोग्य रथाचा उपक्रम घेतला हाती
प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण आटोक्यात येत नाही. शहरात प्रत्येक पेठेबरोबरच तालुक्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. प्रत्येकजण काळजी घेत असला तरीही कळत न कळत कोरोना घरात कसा शिरतोय हे समजत नाही. पोलीस नाक्यावर अडवाअडवी करतेपर्यंत कोरोना दारातून घरात शिरत आहे. अशी सातारा शहरासह जिल्ह्याची परिस्थिती आहे. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात घेण्यात आलेल्या स्वाबमध्ये 2369 जण बाधित आढळून आल्याने आतापर्यंतचा आकडा हा 1लाख 20 हजार 824 वर पोहचला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन दहा कोरोना रुग्णालयांना परवानगी दिली आहे. प्रथमच सातारा शहरात बाल कोविड रुग्णालयास मान्यता दिली आहे.
बाधितांची जिल्ह्यात संख्या वाढत आहे. प्रामुख्याने सातारा शहरात कोरोना बाधितांची प्रमाण धोक्याच्या पातळीवर आहे. संपूर्ण शहर लॉकडाऊन असले प्रत्येक नागरिक स्वतःची काळजी घेत घरात बसत असले तरीही कोराना कधी कसा कोठून येतो हे त्यांनाही समजत नाही. बाधित आलेले कोणाच्या संपर्कात, कोणाच्या सानिध्यात आढळून आले हे समजत नाही. पोलीस मात्र नाक्यावर काठी घेवून येणाऱयाजाणाऱ्यांची अडवणूक करुन त्यांच्या पाठीत काठी मारण्याच्या तयारीत आहेत. सातारा शहरातील अवस्था बिकट असून बाधितांबरोबरच मृत्यूदरही चिंताजनक आहे.
प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. मात्र, कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्यास कारणे अनेक दिसून येत असल्याची चर्चा आहे. शहरातील कंटेटंमेंट झोनमधील नागरिक कामानिमित्त बाहेर भटकत असतात. तर काही कोरोना बधित ज्यांच्यात सौम्य लक्षणे आहेत अशी मंडळीही मोकाट फिरत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली दहा कोविड हॉस्पिटल्सना परवानगी
कोरोना बाधित रुग्णांना बेड मिळत नाही, अशी जिह्यात परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड सेंटरचे उद्घाटन सुरु असताना बाहेरच पॉझिटीव्ह रुग्णांची प्रवेशासाठी रांग आहे. बेडसाठी येत असलेल्या फोनमुळे व्यवस्थाकांचे फोन हँग होत आहे. असे वास्तव भयानक असताना जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने 10 कोविड हॉस्पिट्लला परवानी देण्यात आली असून 490 बेड आता उपलब्ध होणार आहेत.साताऱ्यात लहान मुलांसाठी कोविड सेंटर लहान मुलांनाही कोरोना होत आहेत. लहान मुलांच्या बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सातारा शहरात प्रथमच चिरायू चिल्ड्रेन इन्स्टीटय़ुट व रिसर्च सेंटर येथे दहा बेडचे कोरोना केअर सेंटर सुरु करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिलेले आहेत. सातारकरांसाठी ही खुशीची बातमी आहे.
फलटणला लॉजमध्ये कोविड सेंटर
फलटण येथे प्रथमच उत्कर्ष लॉज येथे भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याने 51 बेडच्या कोविड सेंटरला जिल्हाधिकाऱयांनी परवानगी दिली आहे. त्यामध्ये24 ऑक्सिजन बेड, 2 व्हेंटीलेटर बेड, 25 सामान्य बेड आहेत. या कोव्हिड सेंटरची जबाबदारी उपजिल्हा रुग्णालय फलटणचे वैद्यकीय अधीक्षक अमोल सस्ते यांच्याकडे आहे.
लसीकरणानंतर वैयक्तिक आजारांची नियमित औषधे बंद करू नका
कोरोना लसीकरण योग्य नियोजनाने चालू असून नागरिकांनी लसीकरणानंतरही स्वतःच्या वैयक्तिक आजारांची दररोज चालू असलेली औषधे बंद करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी सी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे तातडीने केले आहे. सध्या कोरोना लसीकरणाचा पहिला डोस तसेच दुसरा डोस देण्याचे काम जिह्यात चालू आहे. या दरम्यान काही ठिकाणी असे निदर्शनास येत आहे की नागरिक स्वतःहून लसीकरणानंतर त्यांना असलेल्या मूळ आजारांची सध्या चालू असलेली औषधे सेवन करणे बंद करीत आहेत. जर एखाद्या नागरिकास मधुमेह, उच्च रक्तदाब असा आजार असेल आणि त्याची औषधे चालू असतील तर ती औषधे बंद करू नयेत. कोरोना लसीचा आणि औषधांचा संबंध नाही. फार आवश्यकता वाटल्यास वैद्यकीय तज्ञांशी, डॉक्टरांशी तातडीने बोलावे. परंतु स्वतःहून लसीकरणानंतर औषध सेवन कोणतेही बंद करू नये, असे कळकळीचे आवाहन या प्रसिद्धिपत्रकात करण्यात आले आहे. 45 वर्षे वयावरील नागरिकांचे 50 टक्के लसीकरण सातारा जिल्ह्यात पूर्ण झाले असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे यादरम्यान इतर आजार असणारे नागरिक लसीकरणानंतर स्वतःहून ही औषधे बंद करीत आहेत. तसे न करता नागरिकांनी ती औषधे चालू ठेवावीत आणि आवश्यकता वाटल्यास वैद्यकीय तज्ञ यांचा सल्ला घ्यावा असे आवाहन गौडा यांनी केले आहे. नागरिक लसीकरणाला शिस्तबद्धरीत्या आणि सकारात्मक प्रतिसाद देत असल्याबद्दल तसेच; प्रशासनाचे नियम जबाबदारीने पाळत असल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांचे धन्यवाद देखील आवर्जून मानले आहेत.
संगममाहुलीत धार्मिक विधी साठी लोकांची मर्यादा
सातारा शहरालगत असलेल्या तीर्थक्षेत्र दक्षिण काशी संगम माहुली या गावातील कैलास स्मशानभूमी मध्ये दररोज शहर व जिल्ह्यातील कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या सुमारे 30 ते 40 व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अंत्यविधी नंतर सावडणे, दशक्रिया व धार्मिक विधी ही येथील कृष्णा- वेण्णा नदीच्या घाटावर केले जात असून या विधीसाठी संबंधित कोरोनाने दगावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोक मोठय़ा प्रमाणावर येत आहेत. संबंधित लोक संगम माहुलीतील काही लोकांच्या संपर्कात आल्याने गावात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संगम माहुलीत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यापुढे कोरोना बाधित व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी कुटुंबातील फक्त दहा तर सावडणे, दशक्रिया या धार्मिक विधीसाठी फक्त पाच नातेवाईकांनीच संगम माहुली येथे यावे. तसेच शक्यतो सातारा शहरा व्यतिरिक्त बाहेर गावच्या कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी आपल्या स्वतःच्या गावात धार्मिक विधी करावेत व गर्दी टाळावी. असे आवाहन संगममाहुली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण शिंदे, उपसरपंच अविनाश कोळपे ग्रामसेवक चाटे व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.
मोफत आरोग्य रथ आपल्या दारी योजना क्षेत्रमाहुलीत
कोरोना रुग्णांवर लवकर उपचार हाच रामबाण उपाय असून त्या करीता रुग्णाला हॉस्पिटल मध्ये त्वरित ने – आण करण्यासाठी क्षेत्रमाहुली विकास मंचच्या वतीने क्षेत्रमाहुली, महागाव,खावली, सोनगाव ,बोरखळ, या भागातील ग्रामस्थांसाठी आपत्कालीन मोफत आरोग्यरथ… आपल्या दारी… हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ना. बच्चुभाऊ कडू यांचे स्विय सहाय्यक व क्षेत्रमाहुली विकास मंच चे संस्थापक सदस्य गौरव जाधव यांच्या संकल्पनेतून व सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून क्षेत्रमाहुली, सोनगाव सं. निंब, महागाव, बोरखळ, खावली, या भागातील कोरोना बाधीत रुग्णांची तातडीने तपासणी व्हावी, व त्वरित वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी संबंधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ने – आण करण्यासाठी या आपत्कालीन मोफत आरोग्य रथ आपल्या दारी ही योजना राबविण्यात येत आहे. या मोफत आरोग्य रथाचे गौरव जाधव, पोपटराव जाधव, निरंजन जाधव, प्रदिप कदम तसेच क्षेत्रमाहुली, बोरखळ, खावली, महागाव, सोनगाव सं. निंब या गावचे सरपंच, ग्रामस्थ, क्षेत्रमाहुली विकास मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
शनिवारी जिह्यात बाधित…..2379, मुक्त…2055, बळी….40
शनिवारपर्यंत नमूने….584930, बाधित….120824….घरी सोडलेले…94134, मृत्यू……2784, उपचारार्थ….23832









