सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घातल्याने राज्यात क्लोजडाऊनचा नियम जारी करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांना अत्यावश्यक गोष्टी उपलब्ध व्हाव्यात, याकरिता बाजारपेठ सकाळी 6 ते 12 या वेळेत खुली ठेवण्यात येत आहे. मात्र या कालावधीत बाजारपेठेत प्रचंड प्रमाणात गर्दी होत असून कोरोनाच्या दृष्टिकोनातून बाजारपेठेतील वाढती गर्दी चिंताजनक आहे.
एकीकडे प्रशासन सोशल डिस्टन्सिंगसह नियम पाळा, असे आवाहन करत आहे. दुसरीकडे मात्र बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या मार्गसूचीनुसार मर्यादा आल्या आहेत. या मर्यादित वेळेत खरेदी-विक्रीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडून कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. सकाळच्या सत्रात बाजारपेठ सुरू ठेवण्यात येत असली तरी दिवसभर शहरात मेडिकल वगळता शुकशुकाट पहायला मिळत आहे.
शहरात क्लोजडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. विनाकारण फिरणाऱयांना आळा घालण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शिवाय अनावश्यक वाहतूक रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मात्र शहरात विनाकारण किंवा किरकोळ बाजारासाठी देखील नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची चिंता व्यक्त होत आहे.
तसेच नवीन मार्गसूचीनुसार विवाह सोहळय़ांवर बंधने आली असली तरी विवाह सोहळय़ांच्या बाजारासाठी बाजारात गर्दी वाढत आहे. नागरिकांच्या तोंडावर मास्क दिसत असले तरी संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे गरजेचे आहे. बुधवारी बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात वर्दळ होती. परिणामी रविवारपेठ, मारुती गल्ली, नरगुंदकर भावे चौक, रामदेव गल्ली आदी ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. शहरातील मुख्य रस्त्यांवर गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेड्स लावले आहेत. त्यामुळे सकाळच्या सत्रात इतर रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. किर्लोस्कर रोड, गणपती गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली या मुख्य रस्त्यांवर बॅरिकेड्स लावल्याने नागरिकांना वळसा घालून बाजारपेठ गाठावी लागत आहे.









