नेहरुनगर येथील घटना, दुर्दैवी कामगार येळ्ळूरचा
प्रतिनिधी/ बेळगाव
बांधकामाच्या तिसऱया मजल्यावरून पडून येळ्ळूर येथील एका सेंट्रिंग कामगाराचा मृत्यू झाला. शनिवार दि. 12 मार्च रोजी सायंकाळी नेहरुनगर परिसरात ही घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
गजानन कल्लाप्पा मेणसे (वय 53, रा. कलमेश्वर गल्ली, येळ्ळूर) असे त्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, तीन भाऊ असा परिवार आहे. नेहरुनगर येथील रामदेव हॉटेलजवळ सुरू असलेल्या एका नव्या बांधकामावर ही घटना घडली आहे.
सायंकाळी काम सुरू असताना तोल जाऊन गजानन खाली पडला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलला आणताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. माळमारुती पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. येळ्ळूर येथील कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली.
नेमकी कोणाच्या दुर्लक्षपणामुळे ही घटना घडली? याचा उलगडा झाला नाही. एफआयआर दाखल झाल्यानंतरच याविषयी अधिक माहिती मिळणार आहे. बांधकामावरून पडून सेंट्रिंग कामगाराचा मृत्यू झाल्याने येळ्ळूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









