44 ठार, 450 हून अधिक जखमी; मृतांमध्ये अग्निशमन दल कर्मचाऱयांचाही समावेश
ढाका / वृत्तसंस्था
आग्नेय बांगलादेशातील एका खासगी कंटेनर डेपोला शनिवारी रात्री भीषण आग लागली. या अग्नितांडवात किमान 44 जणांचा मृत्यू झाला असून 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आग इतकी भीषण आहे की ती विझवताना अग्निशमन दलाच्या सात जवानांचाही मृत्यू झाला आहे. तसेच अग्निशमन दलाचे 15 जवान जखमी झाल्याचे बांगलादेश अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षणाच्या अधिकाऱयाने सांगितले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कराची मदत घ्यावी लागली.
‘द डेली स्टार’ने दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी रात्री चटगावमधील बीएम कंटेनर डेपोला आग लागली. कंटेनरमधील रसायनांमुळे आग भडकल्याचा दावा करण्यात आला आहे. ही घटना चटगावमधील सीताकुंडा उपजिह्यातील कदमरसूल परिसरात घडली. या आगीत होरपळून दुपारपर्यंत 35 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरही मदत व बचावकार्य सुरू होते. या घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किमान 350 लोकांना चटगाव मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, असे चटगावमधील आरोग्य आणि सेवा विभागाचे प्रमुख इस्ताकुल इस्लाम यांनी सांगितले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे सुमारे 40 हून अधिक बंब आणि सोळा रुग्णवाहिकाही घटनास्थळी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रसायनामुळे भडका तीव्र
कंटेनर डेपोमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर काही स्फोट झाले. रसायनांच्या टाक्यांना लागल्याने हे स्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुरुवातीला कंटेनरला आग लागल्याची बातमी आली होती. त्यानंतर स्फोट होऊन आग पसरली. आग व स्फोटांच्या विळख्यात काही पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवानही सापडले होते. काही ठराविक मृतांची ओळख पटली होती.
डेपोमधील रसायन आगीचे कारण
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडय़ा रवाना करण्यात आल्या. सायंकाळपर्यंत 44 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. डेपोमध्ये ठेवलेल्या केमिकलमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे, असे घटनास्थळी पोहोचलेले पोलीस अधिकारी नुरुल आलम यांनी सांगितले.
14 मृतांची ओळख पटली
मृत्यू झालेल्यांपैकी 14 जणांची ओळख पटली आहे. यामध्ये मोहम्मद मोनिरुझमान (32), राणा मिया (22); शकील (22), अलाउद्दीन (35) या चार अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश आहे. तसेच इब्राहिम हुसेन (27), मोहम्मद सुमन (28), तोफेल अहमद (22), अफजल हुसैन (20) मोमिनुल हक (24), मोहिउद्दीन (26), हबीबुर रहमान (26), रबीउल आलम (19), शुमन (28), आणि नोयोन (20) अशी अन्य ओळख पटलेल्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.









